अंढेरा पोलिसांना मिळाला नवीन साथीदार ! वर्दळ असलेल्या मेरा खुर्द चौफुलीवर ठेवणार बारीक लक्ष ; ठाणेदार विकास पाटील म्हणतात,आता गुन्हेगार सुटणार नाही!
Jul 19, 2024, 19:09 IST
चिखली (ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिसीटिव्ही कॅमेऱ्याच्या रूपाने अंढेरा पोलिसांना नवा साथीदार मिळाला आहे. अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील मेरा खुर्द चौफुलीवर हे सिसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. उपरोक्त ठिकाण हे अतिशय वर्दळीचे असून, विविध प्रकारच्या घटना येथे घडल्या आहेत. वाहतुकीचे नियम मोडले किंवा लपून छपून गुन्हा केला तर आता आरोपींची गय केली जाणार नाही असे ठाणेदार विकास पाटील म्हणाले.
जिथे कॅमेरे बसविले, तो रस्ता खामगाव जालना महामार्गाच्या दृष्टिक्षेपात आहे. मागील काही दिवसांमध्ये या रस्त्यावर भयंकर घटना उघडकीस आल्या. अनोळखी मृतदेह ठाकून दिल्याचे इथे उघडकीस आले होते. एवढेच नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी अनेकदा राडा घातल्याचेही दिसून आले. ही गंभीर बाब लक्षात घेवून ठाणेदार पाटील यांनी मेरा खुर्द ग्रामपंचायतच्या सहकार्याने मुख्य चौफुलीवर सीसीटीव्ही बसविण्याचे ठरविले. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांकडे मागणी करण्यात आली. ठाणेदार पाटील यांच्या संकल्पनेतून मेरा खुर्द परिसर व खामगाव जालना मार्गावरील गुन्हेगारीवर अंकुश बसणार असून, पोलिसांसाठीही हे सोयीचे ठरणार आहे.