...अन्‌ जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी थेट गाठले रायपूर पोलीस ठाणे!

शेतकऱ्यांना लुटणाऱ्या पीक विमा कंपनी प्रतिनिधींविरोधात तक्रार
 
रायपूर पोलीस ठाणे
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नुकसानग्रस्त शेतीची नोंद करण्यासाठी पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात रिलायन्स पीक विमा कंपनीच्‍या प्रतिनिधींविरोधात १३ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली आहे. सध्या तक्रारीसंदर्भात चौकशी सुरू असल्याचे ठाणेदार राजरत्न आठवले यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले.

जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीने सव्वा लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यास नुकसानभरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. मात्र बुलडाणा तालुक्यातील शिरपूर आणि माळवंडी येथील शेतकऱ्यांकडून पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीने पिकांचे नुकसान नोंदविण्यासाठी पैशांची मागणी केली. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. विमा योजनेत भाग घेतलेल्या १ लाख २४ हजार ५६८  शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत कंपनीला नुकसानीची माहिती दिली होती. योजनेतील मार्गदर्शक सूचनेनुसार १०० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा अहवाल विमा कंपनीने २ नोव्हेंबर रोजी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला पाठविला होता. मात्र बुलडाणा तालुक्यातील शिरपूर व माळवंडी येथे ४ व ५ नोव्हेंबर रोजी सुटीच्या दिवशी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडे परस्पर संपर्क साधून ५०० ते १००० रुपये गैरमार्गाने वसूल केले. शेतकऱ्यांची व कंपनीचीही फसवणूक केली, अशी तक्रार जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. १९ शेतकऱ्यांनी कंपनी प्रतिनिधींनी पैसे मागितल्याचा कबुली जबाब दिला आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
- राजरत्न आठवले, ठाणेदार, रायपूर पोलीस ठाणे