अन् सोयाबीन सोंगणारे सगळेच मजुर एकाएकी गावात निघून गेले! नगदी पैसे देऊनही कुणी सोंगायला तयार होईना; सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरा गडलिंग गावात आज सकाळी घडलचं तस...

 
gfjkl

सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्या शेतकऱ्यांचा सोयाबीन सोंगण्याचा हंगाम सुरू आहे. साडेतीन ते चार हजार रुपये एकर या दराने मजुरवर्ग सोयाबीन सोंगत आहे. अगदी पहाटे पाचपासून तर संध्याकाळी ७ पर्यंत हे काम सुरू असते. तहान, भूक, आजारपण सगळ विसरून दसरा दिवाळी गोड करण्यासाठी मजुरांची धडपड असते. मात्र आज सकाळी हिवरा गडलिंग शिवारात नियमितपणे सोयाबीन सोंगण्याचे काम सुरू असताना मजुरांच्या अस काही निदर्शनास आल की मजुरांनी काम सोडून गावात धुम ठोकली...

ही वार्ता जशी गावातील इतर शेतातील मजुरांना ,शेतकऱ्यांना कळली तसे सारेच जण काम सोडून गावात पळाले. त्याच झालं अस की हिवरा गडलिंग शिवारात आज सकाळी बिबट्याने एका रोही प्राण्याची शिकार केल्याचे काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले, उभ्या सोयाबीन पिकाच्या शेतात ही घटना घडली.

  याशिवाय एका रोह्याची शिकार करण्याचा बिबट्याचा प्रयत्न फसला मात्र त्या रोह्याला बिबट्याने गंभीर जखमी केले. शिवारात बिबट्या धुमाकूळ घालत असल्याची वार्ता सगळीकडे पसरताच मजुरांनी काम सोडून गावाकडे धाव घेतली आहे. पैशांपेक्षा जीव महत्वाचा अशी प्रतिक्रिया एका शेतमजुराने दिली. दरम्यान सरपंच खरात यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली असून वनविभागाचे पथक हिवरा गडलिंग गावात पोहचणार आहे. बिबट्याला आवर घालण्याची मागणी शेतकरी, शेतमजूर करीत आहेत.