पुरात वाहून गेलेल्या वृद्धाचा तब्बल तीन दिवसानंतर लागला पत्ता! उटी येथे घडली होती घटना..

 
मेहकर(अनिल मंजुळकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) २१ जूनच्या सायंकाळी मेहकर तालुक्यातील जानेफळ परिसरात धोधो पाऊस बरसला. याच दरम्यान उटी येथील, नाल्याला आलेल्या पुरात ६० वर्षीय आनंदा अर्जुन साबळे हे पुरात वाहून गेले होते. या धक्कादायक घटनेनंतर, ग्रामस्थांनी नाल्याच्या परिसरात साबळे यांचा शोध घेतला. तरी ते आढळले नाही. यानंतर प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम सुरू झाली होती. दोन दिवस शोध मोहिमेच्या अथक प्रयत्नातून साबळे आढळले नाही. परंतु आज २४ जूनच्या पहाटे ८ वाजता आनंदा अर्जुन साबळे यांचा मृतदेह घाटनांद्रा शिवारात आढळला. तेथील शेतकरी आनंदा वाते शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना आनंदा साबळे यांचा मृतदेह दिसून आला. 
  उटी येथील रहिवासी आनंदा अर्जुन साबळे हे २१ जूनच्या रात्री संडासाकरीता बाहेर पडले. यावेळी नाल्याला पूर आलेला होता, घटनास्थळी काही ग्रामस्थ उपस्थित होते. पुरातून जाऊ नका असे त्यांनी साबळे यांना सांगितले होते. तरीदेखील साबळे तेथून निघाले. पुराचा वेग इतका होता की, साबळे हे वाहून गेले. ग्रामस्थांनी त्यांची शोधा शोध सुरू केली तरी ते आढळले नाही. प्रशासनाच्या वतीने, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांचे पथकाने शोध मोहीम सुरू केली. गत तीन दिवसात त्यांचा पत्ता लागलेला नव्हता. दरम्यान, आज २४ जूनच्या पहाटे घाटनांद्रा शिवारात त्यांचा मृतदेह आढळला. उटी येथून ५ किलोमीटर अंतरावर ते घाटनांद्रा शिवारात आढळून आले. शेतात फेरफटका मारत असताना आनंदा वाते यांना साबळे यांचा मृतदेह दिसून आला. यानंतर त्यांनी, परिसरात माहिती दिली. घाटनांद्रा शिवारा स्थळी साबळे यांचे नातेवाईक पोहचले असून पोलिसांना देखील कळविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, स्थानिकांनी याबाबत बुलडाणा लाइव्हला संपर्क केला, आणि माहिती दिली.