मेहकरमध्ये अमेरिकन आले! विशेष कार्यक्रमातून रंगला प्रेरणादायी सोहळा...
Jul 8, 2024, 17:39 IST
मेहकर(अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) होय! मेहकरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त चक्क अमेरिकन आले होते. हा कार्यक्रम होता, विद्यार्थी गुणगौरव सोहळा. येथील सप्तशृंगी परिवाराच्यावतीने आगळावेगळा विद्यार्थी गुणगौरव सोहळा आज ८ जुलै रोजी संपन्न झाला. मेहकर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला. सप्तशृंगी संस्थेचे संस्थापक देवानंद पवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ऍड. माधुरी देवानंद पवार हा सोहळा घडवून आणला. त्यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे अमेरिकेतून आले होते.
स्थानिक वेदिका लॉन येथे भव्यदिव्य स्वरूपात गुणवंत सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, अमेरिकेतील शिक्षणतज्ञ एनी विलियम्स आणि कॉरकोरान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परदेशी पाहुण्यांना ऐकण्यासाठी भली मोठी गर्दी जमली होती. भारतातील फुल ब्राईट स्कॉलर असलेले डॉक्टर शिवाजीराव देशमुख हे देखील या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. प्राथमिक, माध्यमिक व उच्च महाविद्यालयातील स्पर्धांना कसे सामोरे जावे. भविष्यातील आव्हाने कशी पेलावी बाबतचे सखोल मार्गदर्शन कार्यक्रमात करण्यात आले. अमेरिकेमधील शिक्षण तज्ञांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अमेरिकन शिक्षण पद्धती समजून सांगितली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्ष ऍड. माधुरी देवानंद पवार यांनी संकल्पना आखली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष कासम भाई गवळी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भास्करराव ठाकरे यांची उपस्थिती लाभली. संस्थेचे संचालक मनीष धोटे, राजेंद्र देवकर, व्यवस्थापक सुभाष खरात यांची देखील उपस्थिती होती.