शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम प्रयत्नशील! योगेंद्र गोडेंचे प्रतिपादन;

वाढदिवशी संपन्न झाला शेतकरी मेळावा! शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे म्हणाले, शेतकऱ्यांना खर्चावर आधारित भाव मिळावा..

 
cvb

 बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  मी ज्या शेतकरी कुटुंबातून आलो, ज्या मातीत आणि परिसरात वाढलो त्या शेतकरी बांधवांचे मी देणे लागतो. माझे वडील स्व. राजेंद्र गोडे यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्यांचा हा वारसा पुढे नेताना शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहून कार्य करेल असे प्रतिपादन योगेंद्र गोडे यांनी केले. कृषी महाविद्यालयात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.

 शेतकऱ्यांच्या सध्याच्या स्थितीला परिवर्तित करण्यासाठी किमान आधारभूत किंमत त्यांच्या मालाला महत्त्वाची नसून उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. उत्तम बाजारपेठ मिळाली पाहिजेत. मालाचे स्वतःच ग्रेडेशन करून वितरित करता आले पाहिजेत. यासाठी सरकार दरबारी प्रयत्न व्हायला हवेत असे प्रतिपादन शरद जोशी प्रणित  शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांनी केले. 

 याप्रसंगी शेतकरी नेते समाधान कणखर, नामदेवराव जाधव, डॉ. विनायक वाघ , कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख चंद्रकांत जायभाये, विषय तज्ञ अनिल तारू, तालुका कृषी अधिकारी विवेक टेकाळे, कृषी अधिकारी सचिन मोरे आणि अभिष्टचिंतन सत्कारमूर्ती योगेंद्र गोडे व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना सरकारची ध्येय धोरण ही शेतकऱ्यांच्या विकासाला अडसर ठरत असून उदाहरणासह त्यांनी पटवून दिले. योगेंद्र गोडे यांनी पुढे बोलताना , शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी उद्योग, व्यवसायाला प्राधान्य देऊन कायम आपल्या अर्थार्जनासाठी प्रयत्नरत राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ चंद्रकांत जायभाये यांनी यावर्षीचे हवामान अंदाज पत्रक आणि तूर लागवडीचे सुधारित वैज्ञानिक तंत्रज्ञान यावर सुंदर मार्गदर्शन केले. विषय तज्ञ अनिल तारू यांनी कृषी विज्ञान केंद्राची उपयुक्तता स्पष्ट केली. तर नामदेवराव जाधव आणि कृषी अधिकारी विवेक टेकाळे यांनी सुद्धा उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित सहाशे पेक्षा अधिक शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाचे सर्टिफाइड पीकेव्ही तारा तूर बियाण्यांचे  वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला बुलढाणा तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव यांनी केले. शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद तथा इंदिरा बहुतेक शिक्षण संस्था परिवारातील लोकांनी परिश्रम घेतले.

दिव्य सेवा प्रकल्पाला ५१ हजार रुपयांचा धनादेश

yg
   
योगेंद्र गोडे यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असतो. यंदाच्या वाढदिवशी नागरिकांना आरोग्य कार्डचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांना जैविक खते आणि बी - बियाण्यांचे वितरण करण्यात आले. शेकडो दिव्यांगाची सेवा करणाऱ्या दिव्य सेवा प्रकल्पाला  ५१ हजार रुपयांचा धनादेश  यावेळी प्रदान करण्यात आला.