रविकांत तुपकरांसाठी अजित पवार सभागृहात आक्रमक! म्हणाले, तुपकरांसह शेतकरी, कार्यकर्त्यांविरुद्धचे गंभीर गुन्हे मागे घ्या! सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असल्याचा केला आरोप

 
ajitpawar
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शेतकरीहितासाठी बुलडाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल केलेले गंभीर स्वरुपाचे गुन्हे शासनाने मागे घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी केली. विशेष म्हणजे यापूर्वीही आपण राज्यपालांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केल्याचा उल्लेख करत त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
 

पीकविमा, अतिवृष्टीची नुकसानभरपाई देण्यासह सोयाबीन, कापसाला दरवाढ द्यावी, या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकरी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११ फेब्रुवारीला आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी हे आंदोलन दडपण्यासाठी वृद्ध शेतकरी, महिला व युवकांवर अमानुष लाठीमार केला. एवढेच नाहीतर दहशतवाद्यांप्रमाणे वागणूक देत पोलिसांनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हे आंदोलन सुरू होते. शासनाने सुरुवातीपासूनच शेतकरीविरोधी धोरण राबवून बळीराजाचे हाल चालविले आहेत. त्यांना न्याय मिळावा म्हणून या आंदोलनादरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. अखेरच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढा देत राहील, असे वारंवार सांगणारे रविकांत तुपकर यांनी अनेकदा आपला जीव केवळ बळीराजासाठी धोक्यात घातला. मात्र, शेतकऱ्यांच्या लढवय्या नेत्याचे अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांच्या दंडुकेशाहीवरून दिसून आल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून आंदोलनाच्या दिवसापासून आजवर उमटत आहेत.

आंदोलनादरम्यान पोलिसांनी बेछुट लाठीचार्ज केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी पोलीस ठाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. लाठीमारानंतर पोलिसांनी गुन्हेगारांप्रमाणे तुपकर यांच्यासह शेतकरी, कार्यकर्त्यांविरुद्ध गंभीर स्वरुपाचे विविध गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेने लढणाऱ्या या नेत्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी करत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अधिवेशनादरम्यान सभागृहाचे लक्ष वेधले.

सभागृहाला करवून दिले स्मरण

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चेवेळीही आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केल्याची आठवणही अजित पवार यांनी सभागृहाला करवून दिली. अध्यक्ष महोदय, शासनाने शेतकऱ्यांबाबत संवेदनशिलता दाखवली पाहिजे, असेही पवार म्हणाले.