अखेर रमाईंच्या लेकींनी केले गाव बंद!जानेफळात घडला खूनाचा थरार! दारूबंदीची रेटली होती मागणी

जानेफळात गुन्हेगारीवर पोलिसांचा अंकुश राहिला नाही.अवैध दारु अनेकांच्या जीवावर उठल्याची तक्रार अनेकदा करण्यात आली. कारवाई होत नसल्याने महिला त्रस्त झाल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र गुन्हेगारी घटना थांबल्या नाहीत. जानेफळ येथील रमाई नगरात ३१ जानेवारी रोजी दुपारी तेजस्वी संस्थान वरुडी येथून जानेफळ ला घरी परतत असताना श्याम मुरलीधर मुरडकर (३५) रा. जानेफळ याला देवलाल किसन सरसंडकर (५५) याने बस स्थानकावर 'मला तू काय बोलला' या कारणावरून गुरांची कातडी सोलणाऱ्या लोखंडी रापीने गंभीर जखमी केले.
सदर जखमीचा मृत्यू झाल्याने आरोपी देवलालवर ३०७ कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील पोलीस शिपाई सुद्धा जखमी झाला.दरम्यान माता रमाई आंबेडकर यांच्या बॅनरखाली अवैध दारूचा व्यवसाय होत असल्याने, ही दारू विक्री बंद करावी, अन्यथा ७ फेब्रुवारीला गाव बंद आंदोलन करण्याचा इशारा, रमाईंच्या लेकीने दिला होता. परंतु प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळे जानेफळ येथे दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. आता येथील अवैध धंदे व गुन्हेगारी रोखण्यासाठीचे पोलिसांपुढे आव्हान आहे.