चिखली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी!; दुचाकीचोर तिघांच्या मुसक्‍या आवळल्या, १५ दुचाकी जप्त

 
chikhali
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे सत्र सुरू होते. चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर चोरट्यांना पकडण्यात यश आले असून, तीन अट्टल चोरट्यांकडून साडेसहा लाख रुपये किमतीच्या १५ मोटारसायकली व दोन पाण्यातील मोटारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आज, १२ जानेवारी रोजी चिखली पोलिसांनी ही कारवाई केली.

संपूर्ण जिल्ह्यात सध्या दुचाकी चोरट्यांनी हैदोस घातला आहे. चिखली शहर व परिसरात सुद्धा गेल्या काही दिवसांत अनेकांच्या मोटारसायकली चोरी झाल्याचे गुन्हे दाखल होते. सातत्याने होणाऱ्या चोरीच्या घटना पाहून चिखलीचे ठाणेदार अशोक लांडे यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले. गुन्हे प्रकटीकरण पथकाला (डीबी) मार्गदर्शन करून चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यातून नारायण अशोक खरात व प्रताप विष्णू कोरडे या दोघांना व साखरखेर्डा येथून रवि दत्तात्रय निकम याला ताब्यात घेतले.

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून १५ मोटारसायकली, दोन पाण्यातील मोटारी व एक मोटारसायकलीचे इंजन असा एकूण साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केली. चोरट्यांकडून टोळीतील आणखी काहींची नावे व गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ज्यांच्या मोटारसायकली गहाळ झाल्या असतील किंवा चोरीला गेल्या असतील त्‍यांनी वाहनांच्या मूळ कागदपत्रांसह चिखली पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन ठाणेदार अशोक लांडे यांनी केले आहे.

ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त (खामगाव), उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक लांडे यांच्या आदेशाने डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे, पोहेकाँ गुलाबराव काळे, विक्रम काकड, अताऊल्ला खान, शरद गिरी, राजू सुसर, उमेश राजपूत, विजय किटे, सुनील राजपूत, रामेश्वर भांडेकर, राहुल पायघन, सुधाकर पाडळे, मपोकाँ मंजुषा चिंचोले, पंचशीला ससाने, ललिता खरात, शेख अश्पाक, राजू भोयर, लक्ष्मीकांत इंगळे, प्रमोद हुसे, श्रावण गोरे यांनी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश हुडेकर, राजेंद्र काळे, संजय कऱ्हाले, पोकाँ सागर कोल्हे, शेख माजीद करीत आहेत.