नाव उलटल्याने महिलेचा नदीत बुडून मृत्यू! ६५ वर्षीय कोकणाबाईंनी वाचवले तिघींचे प्राण; तिघींसाठी "जीवन" ठरला देवदूत! मजुरी आटोपून पैनगंगा ओलांडून येत होत्या ७ जणी..!

१९ मार्चच्या सकाळी सदर मृत महिलेचा मृतदेह आढळून आला.मेहकर पासून जवळच असलेल्या अंत्री देशमुख या गावातील काही शेती ही उकळी शेत शिवारात आहे. पैनगंगा नदी ओलांडून उकळी शेत शिवारात जावे लागते. १८ रोजी देखील काही महिला नेहमीप्रमाणे नावेत बसून शेतात कामाला गेल्या होता. सायंकाळी शेतातून परत येत असताना सरुबाई रामभाऊ राऊत वय ४५ वर्षे, कोकणाबाई बाळासाहेब जाधव वय ६५, सरला मोहन राऊत वय ३५, छाया सुरेश माकोडे वय ५९, सागरबाई ज्ञानेश्वर आखाडे वय ३५, मंदाबाई भवना देशमुख वय ३५, लक्ष्मीबाई प्रदीप सुरुशे वय ३३ ह्या सात महिला नावेत बसल्या आणि नेहमी प्रमाणे दोरी ओढत असतांना ही नाव नदीच्या मधोमध आल्यानंतर कलांडली त्यामुळे या सातही महिला पाण्यात पडल्या. कोकणाबाई जाधव या ६५ वर्षीय महिलेने आपल्या जिवाची बाजी लाऊन तीन महिलांना काठावर पोहचविले तर जीवन राऊत या १६ वर्षीय युवकाने इतर तीन महिलांना किनाऱ्यावर पोहचविले. मात्र सरुबाई रामभाऊ राऊत ही ४५ वर्षीय महिला कुठेच दिसली नाही.जीवन राऊत याच्यासह गावातील इतर युवकांनी नदीपात्रात उड्या घेऊन सर्वत्र शोध घेतला परंतु सदर महिला कुठेच आढळून आली नाही. १९ मार्चच्या सकाळी काही तरुणांनी पुन्हा नदीपात्रात उतरुन शोध घेतला असता सुरुबाईचा मृतदेह नावेखाली गाळात फसलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. सरपंच ज्ञानेश्वर देशमुख, उपसरपंच अंकुशराव देशमुख,संदीप देशमुख, शिवाजी देशमुख, गोपाल देशमुख, जीवन राऊत यांनी पाण्यात उडी घेऊन तीन महिलांना वाचविले तर जीवन देशमुख, दीपक देशमुख, गजानन जाधव, शिवाजी भीमराव देशमुख, गजानन देशमुख यांनी शोधकार्यात मदत केली. यावेळी केशव आखाडे, गजानन आखाडे, शाम पुंड, गजू पुंड, मनोहर देशमुख, बाळू देशमुख, दत्ता सरोदे व गावकऱ्यांनी मदतकार्य केले.
२२ वर्षांपासून नावेतून प्रवास
अंत्री देशमुख येथील काही शेती उकळी शिवारात असून या शिवाराती शेतात जाताना पैनगंगा नदी पार करुन जावी लागते. गेल्या २२ वर्षांपासून शेतकरी तसेच शेतमजूर महिला व पुरुष नदी पार करण्यासाठी नावेतून प्रवास करत आहेत. नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरील झाडांना एक दोरी बांधलेली आहे. छोट्या नावेत बसून ही दोरी ओढून शंभर फूट अंतर पार करण्याचा जीवघेणा प्रवास दररोज दोन वेळा करावा लागतो. आमच्याकडे आपत्ती निवारणाचे साहित्य असते तर ही घटना घडली नसती, गावाची ही अवस्था पाहता शासनाने आपत्ती निवारणाचे साहित्य दिले पाहीजे, असे यावेळी बोलताना सरपंच ज्ञानेश्वर देशमुख यांनी सांगितले.