कंटेनरमधून अचानक धडाधड रस्त्यावर कोसळले मोठमोठे कार्बन पोल... सुदैवाने...

देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना
 
file photo
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रात्रीचे आठ वाजलेले... समोर धावणाऱ्या कंटेनरमधून अचानक २५ ते ३० कार्बन पोल रस्त्यात धडाधड कोसळू लागले... मागून येणाऱ्या कारचालकाने प्रसंगावधान राखून करकचून ब्रेक दाबले..! ते वाचले, पण त्‍यांच्या मागून येणाऱ्या वाहनधारक या काळ्याकुट्ट पोलवर धडकलेच असते... पण तो कटूप्रसंग त्‍यांच्या माणुसकीमुळे टळला..!

अंचरवाडी ते अंढेरा फाट्याजवळील उतारावर हा प्रकार काल, १७ डिसेंबरच्या रात्री घडला. भरधाव कंटेनरमधून कार्बन पोल रस्त्यावरच पडले. कंटेनरच्या मागे चिखली येथे महसूल विभागात कार्यरत असलेले किशोर खांडेभराड (रा. देऊळगाव राजा) यांचे वाहन होते. त्यांनी प्रसंगावधान राखून स्वतःचे वाहन थांबवलेच पण मागून येणारी वाहनांनाही तातडीने इशारा करून थांबवले. अन्यथा मोठीच दुर्घटना घडली असती. रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यात वाहनांचा वेग जास्त असतो. पण तरीही खांडेभराड यांनी स्वतःच्या वाहनावर नियंत्रण मिळवलेच, पण अन्य वाहनधारकांनाही अलर्ट केल्याने अनेक जीव वाचले. नंतर खांडेभराड यांनी अंढेरा पोलिसांना ही घटना कळवली. ग्रामस्‍थ व पोलीस अंमलदार आर. आर. राजपूत आणि श्री. पवार यांनी रस्त्यावरील कार्बन पोल बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

पहा व्हिडिओ ः