शहरातील चौकाचौकात जनावरांचे कळप! वाहतुकीस मोठा अडथळा; योग्य बंदोबस्त कधी? नागरिकांचा सवाल
Jul 19, 2024, 16:23 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरातील मुख्य चौकांमध्ये मोकाट जनावरांचे कळप वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, याआधीही तसे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर नगरपालिकेने जनावरांना पकडण्यासाठी पथक स्थापित करत विशेष वाहन कार्यान्वित आणले. परंतु जनावरांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. यामुळे नगरपालिका प्रशासनाने जनावरांचा योग्य तसा बंदोबस्त लावावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
शहरातील चिखली रोड भागात जनावरांचा मोठा कळप आज सकाळपासून दिसून येत आहे. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा होत असून, अपघात होण्याची शक्यता आहे. मोठी, अवजड वाहने जाताना ट्राफिक जाम झाल्याचे दिसून आले. जनावरांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. याबाबत जनावरांच्या मालकांनीही सतर्कता बाळगावी तसेच नगरपालिकेने जनावरांचा योग्य तो बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रसिद्धी प्रमुख प्रसाद घेवंदे यांनी केली.