गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून झाले भांडण! पाठलाग करत टोळक्याने एकाला बदडले.. बुलढाणा शहरातील घटना..
Jun 17, 2024, 08:47 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) गाडी काढत असताना दुसऱ्या गाडीला धक्का लागल्याने दोघांत शाब्दिक वाद झाला. यानंतर पाठलाग करत एकाने सात ते आठ मित्रांसह दुसऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना चिखली रोड भागात १५ जूनच्या रात्री उशिरा घडली.
प्राप्त माहितीनुसार शहरातील शिवशंकर नगर येथील रहिवासी राजू पवार हे चिखली रोडवरील डीजे हॉटेल येथे मित्रासह जेवायला गेले. जेवण झाल्यानंतर दोघे मित्र बाहेर आले आणि त्यांनी मोटरसायकल काढली. यादरम्यान, त्यांच्या गाडीचा धक्का दुसऱ्याच्या गाडीला लागला. त्यावेळी राजू पवार यांनी आरामात गाडी काढा असे समोरच्या व्यक्तीला सांगितले होते. परंतु त्यांनी शिवीगाळ केल्याने तुम्ही येथून निघून जा, वाद घालू नका असेही राजू पवार त्यांना म्हणाले. त्यानंतर पवार २०० मीटर अंतरावर जावून मित्राच्या केक शॉपीवर थांबले. त्यावेळी तिथे ज्याच्या गाडीला धक्का लागला तो व्यक्ती, इतर चार जणांसोबत आला. यादरम्यान शाब्दिक बाचाबाची झाली. पवार यांच्या मित्रांनी हा वाद तेव्हा जागीच सोडविला. परंतु पुन्हा पाच ते दहा मिनिटानंतर ते टोळके जमले. यावेळी सात ते आठ जणांची टोळी परत आली. पुन्हा वादाला सुरुवात झाली. एका मुलाने राजू पवार यांच्या डोक्यात फायटर हाणली, एकाने दगडाने मनगटावर मारले, ब्लेड मारून जखमी केले. तोंडावर देखील बुक्का मारला. इतकेच नाही तर जीवाने मारण्याची देखील धमकी दिली. या झटापटीत पवार यांच्या खिशातील दहा हजार रुपये व बोटातील अंगठी कुठेतरी पडली. खूप शोधून सुद्धा मिळाली नाही. घटनेनंतर राजू पवार यांनी शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी अज्ञात सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.