आगळा वेगळा वाढदिवस! असा वाढदिवस तुम्ही नसेन पाहिला; लोणार मध्ये साजरा झाला अभयारण्याचा वाढदिवस! कसा आणि का? वाचा...
Updated: Jun 8, 2024, 12:15 IST
लोणार (प्रेमसिंगी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जगविख्यात 'लोणार सरोवर' मधील परिसर सण २००० साली 'लोणार सरोवर अभयारण्य ' म्हणून घोषित झाले. बेस्साल्टिक रॉक मधून तयार झालेले एकमेव सरोवर म्हणून लोणार सरोवराची ओळख आहे. 'लोणार सरोवर अभयारण्य' हे ३६५ हेक्टर जागेतील जिल्ह्यातील सर्वात लहान अभयारण्य ठरले. या अभयारण्याचा २४ वा वर्धापन दिन असून 'मी लोणारकर टीम' ने अनोख्या पद्धतीने हा वर्धापन दिन आज ८ जून रोजी सकाळी साजरा केला. सरोवराकाठी नैसर्गिक केक कलिंगडाचे कटिंग करत आगळ्यावेगळ्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
मेहकर, वाशिम, रिसोड, लोणार येथील निसर्गप्रेमी नागरिकांनी ' मी लोणारकर ' अशी टीम तयार केली. जगविख्यात लोणार सरोवराचे संवर्धन करणे, सरोवराकाठी स्वच्छता ठेवणे, सरोवर परिसरातील मंदिरांची स्वच्छता राखणे, अशा पद्धतीचे कामे ही टीम राबवत असते. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टीमची दखल घेऊन त्यांचे कौतुकही केले होते. मी लोणारकर या टीम मध्ये जवळपास ५० ते ६० उच्चशिक्षित सदस्य आहेत. लोणार सरोवर अभयारण्यातील ३५६ हेक्टर परिसरामध्ये बिबट, कोल्हे, यांसारख्या अनेक वन्य प्राण्यांचा वावर आहे. शहराला लागूनच असलेल्या या अभयारण्यातून कधी माणूस व हिस्त्र प्राण्यांचा संघर्ष झाला नाही हे विशेष. लोप पावत चाललेल्या पर्यावरणाचे संवर्धन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. अभयारण्याचा देखील वाढदिवस अर्थात वर्धापन दिन साजरा झाल्याने एक प्रकारे पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा मिळते. असे 'मी लोणारकर टीमने' सांगितले.
मी लोणारकर टीमचे सचिन कापुरे म्हणतात, शासनस्थरावर वर्धापन व्हावा...
बुलढाणा जिल्ह्यातील 'लोणार सरोवर' जगाच्या पाठीवर नावाजलेले सरोवर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून 'लोणार सरोवर महोत्सव' झालेला नाही. मोठ्या पातळीवर
लोणार महोत्सव साजरा झाला पाहिजे ही मागणी आहे. तसेच शासकीय स्तरावर देखील वनविभाग, पुरातत्व विभाग यातून अभयारण्याचा वर्धापन दिन साजरा झाला पाहिजे. अशी सर्व लोणार प्रेमी, पर्यावरण प्रेमी नागरिकांची मागणी प्रलंबित आहे. शासनाने यावर लक्ष दिले पाहिजे.