डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा! इसरुळ गावात संत चोखोबारायांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा थाटात; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पांडुरंगाची पूजा करून आलो होतो, त्यामुळे कालच्या निकालाचे टेन्शन नव्हते!

जे कले ते कायद्याच्या चौकटीत राहून; हे सरकार देणारे आहे म्हणाले! वारकरी संप्रदाय कलियुगात बॅलन्स करण्याचे काम करीत असल्याचे म्हणाले..
 
Vhut
इसरुळ(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   चिखली तालुक्यातील इसरुळ गावात आज डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  भारतातील पहिल्या श्री.संत चोखोबारायांच्या मंदिराचे लोकार्पण केले. हे सरकार देणारे आहे, सामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. वारकरी संप्रदाय विश्वाला शांती समाधानाचा संदेश देणारा आहे.  श्री संत चोखोबांच्या या तीर्थस्थळाला काहीही कमी पडू देणार नाही, हे सरकार देणारे आहे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

रामकृष्ण हरी म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाची सुरुवात केली. संत परंपरेतील एका महान संतांच्या मंदिराचा कलशरोहण सोहळ्याला उपस्थित राहता आल्याबद्दल आयोजकांना त्यांनी धन्यवाद दिले. पुढे बोलतांना ते म्हणाले की,

सत्ताकारण, राजकारण याच्या वर संत परंपरा असते, साहेबांपेक्षा महाराज मोठे असतात .पंढपूरमध्ये पांडुरंगाची पूजा करता आली तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा भाग्याचा दिवस होता असे मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या सात आठ महिन्यांपासून काय होणार याची चर्चा होती, पांडुरंगाची पूजा करून आल्यामुळे मी टेन्शन मध्ये नव्हतो.जे जे केलय ते कायद्याच्या चौकटीतून केले त्यामुळे काल सुप्रीम कोर्टाने तुमच्या भक्ताच्या बाजूने निकाल दिला, आणि निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला चोखोबांचे दर्शन घेता आले ही भाग्याची बाब आहे असे ते म्हणाले.पुरुषोत्तम महाराज यांनी दिव्य काम केले आहे, कीर्तन सेवेतून मिळणाऱ्या निधीतून त्यांनी मंदिर बांधले, त्यामुळे पुरुषोत्तम महाराजांचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वारकरी संप्रदायावर प्रेम होते. आम्ही त्यांच्यासोबत अनेक कीर्तन कार्यक्रमांना जायचो अशी आठवण यावेळी त्यांनी सांगितली. कीर्तनकार ,वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे भूषण आहे. कलियुगात बॅलन्स करण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत असल्याचे त्यांनी सांगितले.भक्ती साधनेचा मार्गाने लाखो वारकरी जातात.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात देखील संत परंपरेचे महत्व होते..

आमच्या आयुष्यात देखील संत परंपरेचे महत्व आहे. सरकार स्थापन केल्यापासून आम्ही घेतलेले निर्णय हे सर्व सामान्य जनतेसाठी होते,कुण्या एका व्यक्तीसाठी नव्हते असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कालही कार्यकर्ता ,आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करीत राहणार असे मुख्यमंत्री म्हणाले. लहान असताना आई,बाबा , आजोबांसोबत वारीला गेलो असल्याचे त्यांनी सांगितले. "ज्ञानदेवे रचला पाया तुका झालासे कळस" अशी ओवी देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितली. परमेश्वराच्या भक्तीतून देवत्वाकडे जाणारी वारकरी परंपरा महाराष्ट्राचा अनमोल ठेवा आहे, ती टिकवण्यासाठी वारकरी विद्यापीठाची उभारणी करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. श्री संत चोखोबांच्या या पवित्र मंदिर,तिर्थस्थळासाठी काही पडू देणार नाही, तुम्ही जे हवे ते मांगा..हे सरकार देणारे आहे..

चांगल्या कामाला दिल्याने सरकारला काही कमी पडणार नाही असेही मुख्यमंत्री शिंदे शेवटी म्हणाले. प्रास्ताविकात पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले की,  महाराष्ट्रात सर्व संताचे मंदिर आहे,मात्र संत चोखोबारायांचे मंदिर नव्हते, आपण कीर्तनातून मिळणाऱ्या पैशातून घर नाही मात्र चोखोबांचे मंदिर बांधले असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत मंदिरासाठी राजकीय नेत्यांकडून निधी घेतला नाही असे सांगत आता या तीर्थक्षेत्रासाठी मुख्यमंत्री महोदयांनी काहीतरी भरीव योगदान द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मंत्री संदीपान भुमरे, खासदार प्रतापराव जाधव, विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, आमदार श्वेताताई महाले, आमदार संजय गायकवाड,  आमदार नारायण कुचे, आमदार किरण सरनाईक, आमदार संजय रायमुलकर,  माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया, शशिकांत खेडेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत यांच्यासह महाराष्ट्र  भरातील वारकरी, भाविक उपस्थित होते.