दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; देऊळगावराजा तालुक्यातील घटना!

 
756
देऊळगावराजा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :  हेडलाइट नसलेल्या मोटारसायकलने प्रवास करत असताना  मोटारसायकल रस्त्याच्या खाली गेल्याने एका तरुणाचा 
जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. काल, २६ एप्रिलच्या मध्यरात्री १२ च्या सुमारास चिखली देऊळगावराजा रोडवरील रोहना फाट्याजवळ हा अपघात झाला.

आकाश संतोष राजमाने (२२, केळवद, ता. चिखली) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे तर त्याचा गावातील मित्र महादेव गजानन पाटील (२२) हा गंभीर जखमी झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश राजमाने आणि त्याचा मित्र महादेव पाटील हे दोघे मोटारसायकलने सिंदखेडराजा येथे मामाच्या गावाला जात होते.

मोटरसायकलला  हेडलाट नसल्याने त्यांना रस्त्याचा अंदाज आला नाही.  त्यामुळे मोटारसायकल रस्त्याच्या खाली गेली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. रुग्णवाहिकेने दोघांना देऊळगावराजा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केले. मृतक आकाश हा चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाला शिकत होता.

याप्रकरणी देऊळगावराजा पोलीस ठाण्यात मृतक आकाश राजमाने याच्याविरुद्ध स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे व मित्राला जखमी होण्यास कारणीभूत ठरल्या कारणाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास देऊळगावराजा पोलीस करीत आहेत.