बालविवाहाची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून युवकाला मारहाण!; मेहकर तालुक्यातील घटना
Apr 29, 2022, 21:45 IST

मेहकर (अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बालविवाहाची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून युवकाला मारहाण करण्यात आली. आज,२९ एप्रिल रोजी दुपारी बाराच्या सुमारास मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथे ही घटना घडली. याप्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश नारायण पायघन (३२, रा. देऊळगाव साकर्शा) याने याप्रकरणाची तक्रार दिली. मंगेश पायघन याने पोलिसांना माहिती देऊन मागील वर्षी होणारा बालविवाह रोखला असा संशय त्याच्यावर अशोक सखाराम पायघन व योगेश अशोक पायघन यांचा होता. त्या वादातूनच तू बालविवाह का रोखला असे म्हणत दोघांनी मंगेशला मारहाण केली. मंगेशच्या खांद्यावर चाकू लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्या तक्रारीवरून अशोक पायघन व योगेश पायघन विरुद्ध जानेफळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.