पोलीस ठाण्यांच्या आवारात भंगार वाहनांचा खच! या गाड्यांचे करायचे काय?

 
747
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  पोलिसांकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त केली जातात. त्यानंतर ही वाहने पोलीस स्टेशनच्या आवारातच लावली जातात. वर्षानुवर्षे ही वाहने तशीच पडून राहत असल्याने ही वाहने अक्षरशः भंगार होतात, निकामी होतात.  जिल्ह्यातल्या सर्वच म्हणजे ३३ पोलीस ठाण्यांच्या आवारात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे ह्या भंगार वाहनांचे पोलीस काय करत असतील असा प्रश्न पोलीस ठाण्यात जाणाऱ्या येणाऱ्यांना पडत असतो.
 गुन्ह्यातील, अपघातातील वाहने जप्त करतात. जप्त करण्यात आलेल्या वाहनांना पोलीस ठाण्याच्या आवारात लावल्या जाते. सुपूर्द नाम्यावर वाहन मालकाच्या ताब्यात देण्याचा अधिकार पोलिसांना आहे. मात्र बऱ्याचदा कागदपत्रांच्या अभावी अनेक जण त्यांची वाहने तशीच पडू देतात. जप्त करण्यात आलेली बहुतांश वाहने ही अवैध दारू वा गुटखा विक्री या गुन्ह्यातील असतात. मात्र कागदपत्रे नसल्याने ते वाहन सोडवत नाही..
   
या वाहनांचे होते तरी काय?
 गुन्ह्यात वापरलेली किंवा अपघातातील वाहने न्यायालयीन प्रकियेनंतर सोडवता येतात. जी वाहने न्यायालयाच्या सुपुर्दनाम्यावर सुद्धा सोडविली गेली नाहीत अशी वाहने संबधित पोलीस ठाण्याच्या आवरतच लावली जातात. अशा भंगार आणि जुनाट वाहनांचा लिलाव करण्यासाठी न्यायालयाकडून पोलीस परवानगी मागतात. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर अशी वाहने कायदेशीर प्रकियेचे पालन करून भंगारात विकल्या जातात.