कशाला हवा वंशाचा दिवा..! बुलडाण्यात चार लेकींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी!

 
tjgjhyj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वंशाला दिवा म्हणून मुलगा पाहिजेच बापा ही बुरसट विचारसरणी आजही कायम आहे. याच हव्यासापोटी गर्भातच अनेक लेकिंचे जिजाऊ, सावित्री बनण्याचे स्वप्न उध्वस्त केले जाते. पोरगा माय - बापाला वृद्धाश्रमात पाठवत असल्याच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात..मात्र लेक ती शेवटी लेकच असते असं म्हणतात. बुलडाण्यात चार मुलींनी वडिलांचा शेवटपर्यंत सांभाळ करून शेवटी चौघींनी मुखाग्नी दिला..यावेळी अंत्यसंस्काराला उपस्थितीत साऱ्यांचेच डोळे पाणावले होते.

बुलडाणा येथील कोषागार विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी मारोतीराव साळवे (८४) यांचे सोमवारी निधन झाले. मलकापूर रोडवरील आंबेडकर नगरातील त्यांच्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेत चार मुली शिला पंजाबराव गवई, निला बबनराव जाधव, वैशाली प्रशांत कस्तुरे, सरला भास्कर जाधव यांनी खांदा दिला. स्मशानभूमीत चार बहिणींनी वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. आणि वडिलांच्या निधनानंतर सुद्धा मुलाची कमतरता जाणवू दिली नाही. आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठविणाऱ्या मुलांची संख्या जास्त असतात मारोतीराव साळवे यांच्या लेकींनी मात्र समाजापुढे नवा आदर्श ठेवलाय एव्हढे नक्की...