सुरक्षित राहिली ना सडक, काळ देऊ शकतो धडक! वाहतूक नियमांच्या जनजागृतीचा फार्स

 
Ghjj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रस्त्यावरून पायदळ चालत असताना,वाहने केव्हा जोरात जवळून जातात हे समजतही नाही. त्यामुळे नेहमीच जीव मुठीत घेऊन, मनात भीती बाळगूनच पायी चालावे लागते. त्यामुळे नागरिकांनो काळजी घ्या.. कारण शहरातून जाणारा महामार्ग, त्यावरील वाढलेली वाहतूक, समांतर रस्त्यांचा रखडलेला प्रश्‍न आणि त्यातून अपघातांचे प्रमाण वाढून त्यात बळी जाणाऱ्यांची संख्या ही काळजाचा ठोका वाढवणारी आहे. त्यात शहरातील शेकडो ऑटो चालकांनी नियम धाब्यावर बसवल्याने शहरवासीयांची प्रचंड डोकेदुखी वाढली आहे.

बुलडाणा शहरातील बस स्थानकातून जबरदस्तीने प्रवाशांना बोलावून ऑटो,काळी पिवळी जीपमध्ये प्रवासी वाहतूक होते. बस स्थानकासमोरच कुठेही बेशिस्तित ऑटो उभे राहतात. त्यामुळे एसटी सह येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. जांभरून रोडवर, संगम चौक,जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक,कारंजा चौक, चिखली रोडवरील त्रिशरण चौक येथे वाहतुकीमुळे प्रचंड वर्दळ असते. परंतु येथे ट्राफिक पोलीस सकाळी ११ नंतर दिसून येत नाहीत. रस्त्यांवर वाहनांची सर्कस सुरू असते.

सध्या वाहतूक विभागाकडून जनजागृतीचा केवळ फार्स दिसून येतो. वर्षातून केलेली एक दोन वेळेची जनजागृती परिणामकारक दिसून येत नाही. आरटीओ कडून पासिंग केलेल्या ऑटोमध्ये ३  प्रवासी व ड्रायव्हर असा नियम असला तरी क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे ७ ते ८ प्रवासी भरून वाहतूक केली जाते. यामुळे अनेक अपघातांच्या घटना घडत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.