खरंच काय..? पावसाळा अजून चार महिने लांबणार? दसरा दिवाळी पाण्यातच! पावसाचा पॅटर्नच बदललाय ? सोयाबीन सोडा गहू, हरभरा अन कांद्याचेही होतील वांधे..? कशामुळे होतय हे सगळ वाचा..

 
chatri
बुलडाणा( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): साधारणत: पावसाळा म्हटल की जून ते सप्टेंबर असा कालावधी आपल्यासमोर उभा राहतो. सप्टेंबरच्या शेवटी परतीचा पावसाळा असतो. कधी कधी तो आठ - दहा दिवस लांबलाच तर काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान करतो आणि त्यानंतर सुरू होतो रब्बी हंगाम. गहू , हरभरा, कांदा पिकांची तयारी शेतकरी सुरू करतात. मात्र आता हा पावसाळा आणखी ४ महिने पुढे लांबला तर काय होईल..दसरा ,दिवाळी सगळ काही पाण्यात जाईल. सोयाबीन तर सोडा गहू , हरभऱ्याचेही वांधे होतील. ही केवळ कल्पना नसून  महाराष्ट्रातील ख्यातनाम हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरण कुमार जोहरे यांनी तसे होणार असल्याचा दावा केलाय. सध्या सुरू असलेला पाऊस हा मान्सून नसून हा मान्सून पूर्व पाऊस आहे. आता मान्सूनचा पॅटर्नच बदलला असून ४ ऑक्टोबर पासून निंबोस्त्रेटस् ढगांची  निर्मिती प्रक्रिया सुरू होऊन मान्सून पावासाला सुरुवात होईल असे किरणकुमार जोहरे म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

मान्सूनचा कालावधी १ जून ते ३० सप्टेंबर असा असतो. मात्र पावसाळा तब्बल चार महिने पुढे सरकला तर दसरा, दिवाळी पावसातच साजरे करावे लागू शकतात. जानेवारी , फेब्रुवारी महिन्यात सुद्धा मुसळधार पाऊस दिसू शकतो. महापुराचे संकट अजून टळले नसून येणाऱ्या काळात धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे असेही जोहरे म्हणाले. यंदा जुलै महिन्यात झालेला पाऊस हा सुर्यावरील चुंबकीय वादळामुळे पडला. यावर्षी एकही प्रबळ चक्रीवादळ तयार झाले नसून ही गंभीर बाब असल्याचे जोहरे म्हणाले. मान्सूनच्या बदललेल्या पॅटर्नला शेतकऱ्यांनी घाबरून न जाता नव्या पॅटर्नला स्वीकारावे लागेल असेही जोहरे म्हणाले.


 राज्यातील बहुतांश धरणे आता भरली आहेत. मात्र येणाऱ्या काळातील पावसाचा अंदाज घेता धरणांतील पाणी आतापासून कमी कमी करत येणाऱ्या पावसाचे पाणी साठवण्यासाठी ३० ते ४० टक्के जागा करून ठेवण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. सूर्यावर तयार झालेल्या वादळी परिस्थितीचा परिणाम म्हणून वैश्विक किरणे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर आदळली. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात खळबळ झाली आणि त्यानेच क्युमो - लोनिंबस ढगांची निर्मिती होऊन ढग फुटी होत असल्याचे जोहरे यांचे म्हणणे आहे. नोव्हेंबर महिन्यानंतर सुद्धा देशासह महाराष्ट्रात  मोठा पाऊस पडणार असल्याने धरणांच्या पाण्याचे नियोजन गरजेचे असल्याचे हवामान शास्त्रज्ञ प्राध्यापक किरणकुमार जोहरे यांनी सांगितले आहे.