क्या बात..! ज्यांनी अपहरणाचा कट रचला त्यांनाच नोकरीची ऑफर! यालाच म्हणतात भाईजिंचा अनोखा पॅटर्न

 
bhaiji
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):    बुलडाणा अर्बनचे संस्थापक भाईजी चांडक आणि मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट रचल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. बुलडाणा शहरातील तिघांना दिल्लीत आयबीने अटक करून बुलडाणा पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर तिघांविरुद्ध बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र या अपहरणाच्या कटात सहभागी असणाऱ्या तीनही तरुणांना आता भाईजींनी नोकरी देण्याची किंवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.  महाराष्ट्र टाइम्स ने हे वृत्त दिले आहे.

भाईजिंच्या या अनोख्या कार्यपद्धतीची सगळीकडे चर्चा होत असून हा "भाईजी पॅटर्न" असल्याचे बोलल्या जात आहे. याबद्दल बोलतांना भाईजी म्हणाले की तीनही युवकांची माहिती घेतल्यानंतर ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरुद्ध याआधी कोणताही गुन्हा दाखल नव्हता. मात्र बेरोजगार असल्याने ते अशा मार्गाकडे वळले . त्यामुळे त्यांना नोकरी देण्याचा प्रस्ताव मांडल्याचे भाईजी चांडक म्हणाले.