सततच्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात! भाजीपाल्याचे भाव वाढणार..!

 
bhajipala
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): परतीचा पाऊस वादळ वारा घेऊन कोसळत असल्याचे भाजीपाला पिंकांचे जिल्हाभरात मोठे नुकसान होत आहे. पालेभाज्या पिंकाचे मोठे नुकसान होत असल्याने येत्या दोन - तीन दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात वाढ होत असून ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 जिल्ह्यात नगदी पैसा देणारे पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.कोथिंबीर, पालक, मेथी , शेपू या पालेभाज्यांचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्याला कारणही तसेच आहे. कमी क्षेत्रात कमी कालावधीत शेतकरी इतर पिकांच्या तुलनेत चांगले उत्पन्न घेत आहेत.

मात्र गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात वादळी पावसाने थैमान घातले आहे. या सततच्या पावसामुळे भाजीपाला काढता येत नसल्याने, तसेच काही शेतात पाणी तुंबल्याने भाजीपाला पिके सडली आहेत. याचा परिणाम आता भाजीपाल्याच्या बाजारपेठेवर होणार असून काही ठिकाणी तसा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत भाजीपाल्याचे दर चांगलेच महागणार आहे.