चैत्रात पेटला वैशाख वणवा! एप्रिल मध्यावरच बुलडाण्याचं तापमान ४२ डिग्रीच्या घरात!!

जे न देखे रवी ते देखे कवी असे म्हणतात. कवी 'बी' यांनी १९३० मध्ये याच दृष्टीने बुलडाण्याचं सौन्दर्य टिपले. आपल्या 'एकदृश्य' या कवितेत त्यांनी आटपाट बुलडाणा नगरीचे वर्णन'
"विदर्भात डोंगरात आहे गाव नाव बुलठाणे, वनलक्ष्मीच्या शृंगाराचे एक अलौलीक लेणे" असे केले. मात्र मागील काही दशकात हे चित्र झपाट्याने बदलत गेले.
आता तर बुलडाणा शहर तापमानाच्या बाबतीत विदर्भातील इतर जिल्ह्याशी स्पर्धा करु लागलंय! यंदा एप्रिल महिन्यात आजवर केवळ २ दिवसच शहराचे तापमान ४० डिग्रीच्या च्या खाली गेले. उर्वरित १६ दिवस ते ४० ते ४१.५ डिग्रीच्या दरम्यान रेंगाळत राहिले. १७ एप्रिलला ४१.२तर आज सोमवारी ते ४१.३ डिग्री सेल्सियस वर पोहोचले. ८ तारखेला त्याने रेकॉर्ड ब्रेक ४१.५ डीग्रीपर्यंत उसळी घेतली. यामुळे चालू महिन्यातच हे तापमान ४२ च्या घरात पोहोचेल अशी भीषण चिन्हे आहेत. मे मध्ये तापमान कोणता कळस गाठते याची 'हॉट ' कल्पनाच न केलेली बरी!...