केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती! बोगस डॉक्टरांच्या मुद्द्यावर सुनावले, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील गैरसोयींवरही नाराजी व्यक्‍त

 
8568
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार काल, २१ एप्रिलच्या रात्रीपासून आज, २२ एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत जिल्ह्यात होत्या. त्यांचा शासकीय दौरा चिखली विधानसभा मतदारसंघापुरता मर्यादित असला तरी या दौऱ्यात जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणेचा त्यांनी आढावा घेतला. विधानसभेच्या चिखली मतदारसंघात त्यांनी ४२ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन केले. धाड येथे हिरकणी महिला अर्बन बँकेच्या शाखेचे उद्‌घाटन केले. त्यानंतर दुपारी चिखली येथील हॉटेल स्वरांजली येथे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन त्या नाशिककडे रवाना झाल्या.

तळागाळातील आरोग्य सेवा विस्कळित होऊ नये यासाठी आरोग्य मंत्रालयाचे प्रयत्न सुरू आहेत. गावांतील रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरात जायची गरज पडू नये, त्यांना आहे त्या ठिकाणी सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे प्रयत्न सुरू असल्याचे त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या. जिल्ह्यात १८० ई संजीवनी सेंटर उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

धाड येथे २ कोटी ८५ लाख रुपये खर्चून आयुष रुग्णालय उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यात १३ तालुक्यांतील शासकीय रुग्णालयात १७ एक्स रे मशीन आहेत. पैकी सध्या १३ सुरू आहेत. ३ सिटी स्कॅन मशीन आहेत; मात्र त्या अपुऱ्या पडत असल्याने संख्या वाढवणार असल्याचे मंत्री भारती पवार म्हणाल्या. जिल्ह्यातील ५ सेंटरवर ४४ डायलिसीस मशीन उपलब्ध असल्याचे आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले.

मंत्र्यांची गाडी अचानक प्राथमिक आरोग्य केंद्रात धडकते तेव्हा...
मंत्री भारती पवार काल रात्री औरंगाबादवरून चिखलीत आल्या. वाटेत अचानक रात्री ८ वाजता त्यांनी देऊळगाव मही येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. मंत्र्यांच्या अचानक भेटीमुळे तिथल्या डॉक्टरांची तारांबळ उडाली. रुग्णालयातील बेडवर बेडशीट नव्हत्या. ज्या बेडवर बेडशीट होत्या त्याला रक्ताचे डाग लागलेले होते.  रुग्णालयात असलेल्या अस्वच्छतेमुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. आज झालेल्या आढावा बैठकीत या मुद्यावरून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

बोगस डॉक्टरांचा मुद्दा गाजला!
जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुटला असून, त्यांच्यावर कारवाई करावी, असे निवेदन डॉक्टरांनी मंत्री भारती पवार यांनी दिले. आढावा बैठकीत आरोग्य  राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली तेव्हा जिल्ह्यातील ४ बोगस डॉक्टरांची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बोगस डॉक्टरांची काय चौकशी करण्यात येत आहे, त्यांच्यावर कारवाई होत आहे याबद्दल तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्याचे भारती पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आमदार आकाश फुंडकर, आमदार श्वेताताई महाले पाटील  यांची उपस्थिती होती.