UPDATE रविकांत तुपकरांचा डंका! दोन दिवसांच्या आत शेतकऱ्यांना रोहित्र लावून देण्याचा अधीक्षक अभियंत्यांचा लेखी शब्द; १० रोहित्र तातडीने दिले!

तुपकरांचा इशारा.. म्हणाले, शब्द पाळा अन्यथा फटके..
 
jughg
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथील महावितरण मेंटेनन्स कार्यालयात आज, १९ नोव्हेंबरला संध्याकाळपासून सुरू असलेले  ठिय्या आंदोलन  रविकांत तुपकरांनी अखेर रात्री १० च्या सुमारास मागे घेतले. अधीक्षक अभियंता बद्रीनाथ जायभाये यांनी आंदोलक शेतकऱ्यांना १० रोहित्र तातडीने तर उर्वरित रोहित्र २ दिवसांच्या आत देण्याचा लेखी शब्द देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती तुपकरांना केली. दिलेला शब्द पाळा अन्यथा महावितरण अधिकाऱ्यांना,कर्मचाऱ्यांना फटके देऊ असा इशारा यावेळी तुपकरांनी दिला. ६ तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर तुपकर १० रोहित्र घेऊनच कार्यालयाच्या बाहेर पडले. त्याआधी महावितरण कार्यालयाच्या आवारातच तुपकरांनी शेतकऱ्यांच्या सोबतच जेवण केले.

jghh

 रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली असली तरी शेतकऱ्यांना वेळेवर रोहित्र मिळत नाही. जळालेले रोहित्र महिना महिनाभर दुरुस्त होत नाही. त्यामुळे अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्याच्या हातून रब्बीचे पीक जाण्याची देखील भीती निर्माण झाली. महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. शेतकऱ्यांनी जळालेल्या रोहित्रांचे पैसे भरले मात्र अजून शेतकऱ्यांना रोहित्र मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जोपर्यंत रोहित्र मिळत नाही तोपर्यंत महावितरणच्या मेंटेनन्स कार्यालयातून उठणार नाही अशी भूमिका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी  घेतली होती.

१९ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून तुपकरांनी कार्यालयाच्या आवारात शेकडो शेतकऱ्यांसह ठिय्या मांडला होता.दरम्यान जिल्हाभरातील शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बुलडाण्याच्या दिशेने  निघाले होते. महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे तुपकर चांगलेच आक्रमक झाले होते. तूपकरांची आक्रमकता पाहता कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखेर अधीक्षक अभियंता बद्रीनाथ जायभाये यांनी वरिष्ठांना आंदोलनाच्या तीव्रतेची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून बुलडाणा जिल्ह्यासाठी तातडीने ऑईल उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान तातडीने १० रोहित्र आंदोलक शेतकऱ्यांना देण्यात आले, उर्वरित रोहित्र दिनांक २१ नोव्हेंबरच्या आत देण्याचे लेखी पत्र अधीक्षक अभियंता जायभाये यांनी शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर १० रोहित्र घेऊनच तुपकर आंदोलक शेतकऱ्यांसह महावितरण कार्यालयाच्या बाहेर पडले. तुपकरांसमवेत विनायक सरनाईक, भगवान मोरे, दत्ता जेऊघाले, आकाश माळोदे, भारत वाघमारे, विठ्ठल झगरे, अंकुश सुसर, कैलास घाडगे ,अरुण पन्हाळकर, मधुकर चव्हाण , संदीप घाडगे, पंढरी घाडगे, प्रद्युम्न घाडगे, हरिदास घाडगे, ज्ञानू जाधव, बाळासाहेब झगरे, निवृत्ती मोरे, राजू मोरे, शिवदास परिहार, दत्तू परिहार यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.