चिखलीच्या यात्रेत शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक; एकाजवळून चाकू दुसऱ्याकडून तलवार जप्त !
Mon, 18 Apr 2022

चिखली ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली येथील रेणुका देवी यात्रेच्या वहन मिरवणुकीत गर्दीत फिरतांना शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना चिखली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक खंजर ( चाकू) व एक तलवार जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. महेश जगीश खुनारे ( २४, रा. आनंदनगर चिखली ) व विशाल उर्फ डूब्ल्या राजेश दांडगे (२१, रा. गांधीनगर चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
चिखली येथील रेणुकादेवीची वहन मिरवणुक यंदा १६ एप्रिलच्या रात्री काढण्यात आली. या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले होते. दरम्यान या मिरवणुकीत संशयास्पद फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केल्यावर महेश खूनारे याच्याकडून तलवार तर विशाल दांडगे याच्याकडून चाकू जप्त करण्यात आला. दोघांकडे कोणताही शस्त्र परवाना नसतांना केवळ दहशतीच्या उद्देशाने दोघे शस्त्र बाळगत असल्याचे समोर आल्याने दोघांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास चिखली पोलीस करीत आहेत.