तुपकरांचा संघर्ष काही संपेना ! कृतज्ञता सोहळ्यातही वरुण राजाशी मुकाबला!! मान्यवरांसह चाहत्यांची मांदियाळी; सोहळा झाला लेट, पण मनाला भिडला थेट..

 
,mnb
 बुलडाणा ( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  विशीमध्येच  घरावर तुळशीपत्र ठेवून शेतकरी चळवळीला  वाहून घेतलेल्या रविकांत तुपकरांच्या   कुंडलीत संघर्ष  हा शब्द अढळ स्थान ठेवून आहे.  आज ,१२  जूनच्या मुहूर्तावर आटपाट बुलडाणा नगरीत आयोजित कृतज्ञता सोहळ्यात देखील संघर्ष अटळ ठरला! वरुण राजाने अभूतपूर्व, राजकारणाचा गंध देखील नसलेल्या या सोहळ्यात हजेरी लावली !! यामुळे सोहळ्याचा मुहूर्त टळला, लांबला. रेसिडन्सी क्लब च्या हिरव्यागार लॉन वर आयोजित हा कौटुंबिक स्वरूपाचा कार्यक्रम ऐनवेळी हॉल मध्ये अन पावसाने स्टॉप घेतल्यावर पुन्हा कार्यक्रम लॉन वर आयोजित करण्यात आला. अखेर... स्वाभिमानिकार रविकांत तुपकर अन त्यांच्या  हजारो चाहत्यांच्या सैन्या पुढे अखेर पावसाने सपशेल माघार घेतली... 

मृग धारांच्या शिडकाव्यामुळे वातावरणात पसरलेला मातीचा गंध, राज्यभरातील विविध क्षेत्रातील मातब्बर, कर्तृत्ववान मान्यवर, भव्य व्यासपीठ, तुपकरांचे  चाहते, कार्यकर्ते अन समर्थकांची मांदियाळी, हिमांशू बक्षी यांच्या बासरीतून निनादणारे मधुर स्वर, अन  विणा दिघे यांचे तितकेच  मधुर  व धाराप्रवाही संचलन अश्या थाटात व दिमाखात ब्रेक के बाद हा सोहळा पुन्हा सुरू झाला.  शेतकरी  नेता अशी उपाधी मिळालेले  रविकांत तुपकर यांचा आजवरचा चळवळीचा झंझावाती प्रवास स्वबळावर अन कार्यकर्त्यांच्या पाठबळावर झालाय. मात्र त्यांचा वाहन प्रवास हा मित्र आप्तेष्टांच्या वाहनवरच झालाय ,हे विशेष! ही सल, शल्य दूर करण्यासाठी त्यांचे चाहते, कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वर्गणीतून एक वाहन प्रदान करण्यात आले. 
  
छत्रपतीसह काळ्या माय अन बैल बंडीचे ही पूजन

 पावसाच्या विघ्नामुळे रात्री पावणेआठ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाची प्रारंभ देखील हटके अन दिमाखदार ठरला! ढोल ताशा, तुतारी या पारंपरिक वाद्यांच्या निनादात कार्यकर्त्यांनी तुपकरांना  अक्षरशः खांद्यावर बसवून व्यासपीठावर आणले. यानंतर शिवरायांच्या मूर्तीसह काळ्या माती व बैल बंडीचे पूजन करण्यात आले. शिवमती अनघा पाटील यांच्या जिजाऊ वंदनाने वेगळाच माहौल तयार झाला.  व्यास पिठावर लोककवी विठ्ठल वाघ, पद्मश्री पोपटराव पवार,  सत्यपाल महाराज,  सहकार नेते राधेश्याम चांडक, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव ओमप्रकाश शेटे,  माजी केंद्रीय मंत्री महादेव जानकर, लेखक संदीप काळे यांच्यासह रविकांत तुपकर अन त्यांच्या संघर्षात खांद्याला खांदा लावून  साथ देणाऱ्या  अर्धांगिनी ॲड. शर्वरी तुपकर विराजमान होत्या.

ravikant tupkar

लोकरथाचे प्रदान

 यानंतर सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेला वाहन अर्पणाचा असलेला सोहळा पार पडला. तुपकरांचे खंदे सेनापती स्वर्गीय राणा चंदन यांच्या मातोश्री व पत्नीच्या हस्ते या वाहनाचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रातील गौरव पर भाषणाना संदीप काळे यांच्या शॉर्ट बट स्वीट मनोगतात तुपकरांचे भरभरून कौतुक केले. ओमप्रकाश शेटे यांनी माणसाचे मोठेपण त्याच्या मनाच्या मोठेपनावर  अवलंबून असते असे सांगून त्यांनी तुपकरांच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. लोकसंग्रह, चाहत्यांचे प्रेम ही तुपकरांची मोठी संपत्ती असल्याचे ते म्हणाले.  तुम्हाला मिळालेल्या वाहनाचे  स्टेअरिंग श्रीकृष्णाच्या हाती दया , तुमच्या या गाडीवर लाल दिवा कसा लागत नाही हे आम्ही पाहतो असा षटकार मारून त्यांनी आपल्या भाषणाला विराम दिला.

राधेश्याम चांडक यांनी आपल्या छोटेखानी मनोगतात आज एका नवीन राजकीय पर्वाला सुरवात झाल्याचे सूचक विधान करून तुपकरांना भावी वाटचालीबद्धल शुभेच्छा दिल्या. पोपटराव पवार यांनी रविकांत तुपकर हे राज्याच्या शेतकरी चळवळ मधील आघाडीचे नाव असल्याचे सांगितले. जिल्ह्याला दिलेल्या भेटींचा उल्लेख करून संघर्ष करणाऱ्याच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले.  आगामी काळात शेती करणे मोठे आव्हान ठरणार असून दर्जा खालवलेली माती आणि दूषित पाणी यासाठी जवाबदार आहे.सत्यपाल महाराज यांनी आपल्या हटके स्टाईल मध्ये उपस्थितांना मनमुराद हसविले. भ्रष्ट समाजव्यवस्था वर  टीका करून अधूनमधून अंतर्मुख करताना नर्म  विनोदाची शिंपडन केली. कार्यक्रमाच्या समारोपात कार्यक्रम स्थळी आगमन करीत सर्वांना  सुखद आश्चर्यचा  धक्का देणारे माजी मंत्री महादेव  जानकर यांनी तुपकरांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

रविकांत तुपकर यांनी  आपल्या कृतज्ञता पर भाषणात आपल्या ऋणातून मुक्त होणे अशक्य असल्याचे सांगितले. बुलडानेकरांनी १८ वर्षे सांभाळ केला, प्रेम दिले हे कधीच विसरणार नाही. अन्नत्याग आंदोलनाचे यश हे आपले नसून आपल्या पाठीशी उभे राहणाऱ्या शेतकरी व कार्यकर्ते यांचे आहे. आजचा सोहळा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे असे समजतो. एवढं प्रेम मिळाले की मी धन्य झालो, भविष्यात काही झालो नाही तरी जगणार तुमच्या साठीच अन मरणार तेही तुमच्यासाठीच ! पण तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही तुपकर यांनी यावेळी दिली. अध्यक्षीय भाषणात विठ्ठल वाघ यांनी वाहन हे गतीचे प्रतीक असल्याचे सांगून यामुळे त्यांची शेतकरी चळवळ आणखी गतिमान होईल असा विश्वास तिफणकारांनी बोलून दाखविला.

 वेदनांचे भान

या सोहळ्यातही शेतकऱ्यांच्या वेदनांचे भान ठेवण्यात आले. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना  मदत करण्यात आली. कृतज्ञता सोहळ्याची पार्श्वभूमी अन तुपकरांचा जीवन प्रवास याचा धावता आढावा घेतला पत्रकार आणि निवेदक राजेंद्र काळे यांनी.