राणा चंदन यांना रक्तदानातूनच देणार श्रद्धांजली! प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त उद्या रक्तदान शिबिर

 
gfn
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अडल्या, नडल्यांच्या मदतीसाठी अर्ध्यारात्रीही धाऊन जाणारा आणि रुग्णांना रक्त मिळवून देण्यासाठी स्वत:रक्ताच पाणी करणारा एक झुंझार कार्यकर्ता म्हणून स्व.राणा चंदन यांचे नाव आजही घेतले जाते. त्यामुळे स्व.राणा चंदन यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदानातून श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदशनाखाली ११ सप्टेंबर रोजी स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कुणालाही रक्ताची गरज भासली की आपसूकच सर्वांच्या तोंडी स्व.राणा चंदन यांचे नाव यायचे. रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी राणाजी हे विश्वासाच ठिकाण होतं. राणा चंदन हे एक चालती बोलती रक्तपेढीच होते. एखाद्या रुग्णांला रक्त उपलब्ध करुन देण्यासाठी राणा चंदन सरकारी रुग्णालय किंवा खासगी रक्तपेढीत गेले नाही, असा एकही दिवस उजाडत नसे. शिवाय रक्तदान करण्यासाठी युवकांना प्रोत्साहीत करण्याची राणाजींची कला भन्नाट होती, त्यांच्या एका आवाजात दहा जण रक्त देण्यासाठी धाऊन यायचे.

परंतु दुर्दैवाने काळाने त्यांना आपल्यातून हिरावून घेतले, त्यांना जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनी रक्तदान करुन खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष कृतीतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर, बुलढाणा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी- विद्यार्थीनी, युवक-युवती, शहरी नागरिक,शेतकरी व कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन, स्व.राणा चंदन यांना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे.