ट्रॅव्हल्सने अल्टो कारला चिरडले; तिघे जागीच ठार, साखरपुड्यासाठी जात होते, मेहकर तालुक्यातील घटना
Apr 23, 2022, 18:00 IST
मेहकर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ट्रॅव्हल्स आणि अल्टो कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील तीन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. नागपूर- मुंबई हायवेवर मेहकरजवळील खंडाळा देवी गावाजवळ हा अपघात आज, २३ एप्रिलच्या पहाटे पावणेचारच्या सुमारास झाला. अपघातात ठार झालेले व जखमी झालेले सर्व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचे असून, ते यवतमाळ जिल्ह्यातील डिग्रस येथे साखरपुड्यासाठी जात होते.
इंदल चव्हाण (३८), योगेश विसपुते (२४) आणि विशाल विसपुते (३४) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत, तर अल्टो कारचा चालक ज्ञानेश्वर रघुनाथ चव्हाण (३२) व मिथुन रमेश चव्हाण (२४) गंभीर जखमी झाले आहेत.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथील सैनी ट्रॅव्हलची बस पुण्याकडे जात होती. मेहकर- डोणगाव दरम्यान असलेल्या खंडाळा देवी गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या अल्टो कारला ट्रॅव्हल्सने धडक दिली.
या अपघातात अल्टो कारचा चेंदामेंदा झाला आणि कारमधील तिघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमींना आधी मेहकर ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातास कारणीभूत ठरलेली ट्रॅव्हल मेहकर पोलिसांच्या ताब्यात आहे. तपास ठाणेदार निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस करीत आहेत.