बँकेत चकरा मारून दमला शेतकरी! अधिकारी म्हणाले आता कर्ज देण्याची मुदत संपली..! अंढेऱ्याच्या हतबल शेतकऱ्याचे बुलडाणा लाइव्हला पत्र; म्हणाला आता तुम्हीच सांगा कुणाकडं जावं अन् कुणाल सांगाव..

 
shetkari
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतात राब राब राबणाऱ्या शेतकऱ्याला कुणीच वाली नाही का हो..पिकर्जाची घोषणा होते..भाबड्या आशेने बिचारे शेतकरी बँकेत जातात मात्र तिथे मदत होण्याऐवजी अपमानच येतो नशीब..आमची कर्ज देण्याची मुदत संपली, तुम्हाला कर्ज मिळणार नाही अशीच भाषा वापरतात बँकेवाले..तुम्हीच सांगा आता काय करावं शेतकऱ्यांन..जहर खायले पैसे नसतांना उसनवारी करून पेरणी करावं लागली..खरच कुणी वाली नाही शेतकऱ्याले..! कुणाकड करावी तक्रार..? हे शब्द आहेत देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा येथील शेतकरी गजानन भगवान तेजनकर यांचे...बुलडाणा लाइव्ह ला पत्र पाठवून त्यांनी त्यांची अडचण सांगितली.
 

गजानन तेजनकर यांची अंढेरा भाग १ मध्ये गट न २४७ मध्ये ५५ आर जमीन आहे. गावातीलच विदर्भ कोकण बँकेत त्यांनी पीकर्जासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे जमा केली. त्यासाठी अनेकदा बँकेत चकरा मारल्या. तिथले अधिकारी मात्र उडवाउडवी चे उत्तरे देत असल्याचे तेजनकर यांनी सांगितले. कर्ज देण्याची मुदत संपली आहे..तुम्हाला पीक कर्ज मिळू शकत नाही..आमच्या कर्ज देण्याच्या फाईली पूर्ण झाल्या आहेत असे अधिकारी म्हणत असल्याने तेजनकर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

 ही अडचण केवळ गजानन तेजनकर यांचीच नसून अंढेरा येथील रविराज माणिकराव देशमुख , कांताबाई देशमुख यांसारख्या अनेक शेतकऱ्याची अशीच अवस्था असल्याचे तेजनकर यांनी पत्राद्वारे कळविले आहे. पीक कर्ज न मिळाल्याने आम्हाला सावकाराकडून कर्ज काढावे लागले..आता तुम्हीच सांगा आम्ही काय करावं, कुणाला आमची अडचण सांगावं असा हताश सवालही गजानन तेजनकर यांनी पत्राच्या शेवटी विचारला आहे.