यंदाची गौण खनिज रॉयल्टी वसुली ठरली टी- २० चा सामना ! शेवटच्या "षटकात" तब्बल ४४ कोटींची वसुली!! बुलडाणा ठरला विभागाचा उपविजेता

 
retighat
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शासनाच्या तिजोरीत जवळपास १ अब्ज रुपयांची घसघशीत भर घालणारी  यंदाची गौण खनिज रॉयल्टी वसुली  थरारक ट्वेन्टी ट्वेन्टी सामना ठरला! शेवटच्या मासरूपी षटकात तब्बल ४४ कोटी रुपयांची वसुली करीत बुलडाणा जिल्ह्याने अमरावती विभागाचे उप विजेतेपद पटकावून आपला लौकिक कायम ठेवला.

 बुलडाणा जिल्ह्याने यंदा रॉयल्टीपोटी तब्बल ९२ कोटी  २४लाख  ८३ हजार रुपयांची वसुली करण्याचा भीम पराक्रम केला आहे. बुलडाणा जिल्हा अमरावती  महसूल विभागात दुसरा ठरला आहे. यामुळे  आजवरच्या काळात रॉयल्टी वसुलीत  विभागातून प्रथम किंवा द्वितीय क्रमांक पटकवण्याची उज्ज्वल परंपरा जिल्ह्याने कायम ठेवली आहे. मात्र यंदा हा लौकिक टिकविण्यासाठी जिल्ह्याला  सेमिफायनल पर्यंत जोरदार संघर्ष करावा लागला. ' उपांत्य सामन्यात' जिल्हा पराभूत होणार अशीच चिन्हे होती. मात्र जिल्हाधिकारी , महसुल अधिकारी, खनिकर्म विभाग यांनी हा सामना जिंकत विजयश्री अक्षरशः खेचून आणली !

सन २०२१- २२ या आर्थिक वर्षासाठी  जिल्ह्याला  ९५ कोटी ७८ लक्ष रुपये रॉयल्टी वसुलिचे उद्धिष्ट देण्यात आले होते. विविध अडचणी व कारणामुळे एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २२ या ११ महिन्यांच्या कालावधीत यंत्रणांना केवळ ४८ कोटी ३७ लाख ५३ हजार रुपये इतकीच वसुली करता आली. 
 
३१ दिवसात ४४ कोटी वसूल..

 यामुळे राहिलेल्या एका महिन्यात सर्व कसर भरून काढण्याचे आव्हान महसूल यंत्रणा समक्ष उभे ठाकले! मात्र जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, आरडीसी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च महिन्यात परिश्रम घेत यंत्रणांनी ३१ दिवसांतच तब्बल ४३ कोटी ८७ लाख २९ हजार रुपये रॉयल्टी वसूल करीत दम(दाम)दार कामगिरी बजावली. यामुळे  टार्गेट च्या ९६. ३१ टक्के वसुली करणारा जिल्हा विभागात दुसरा आला आहे.