यंदाच्या शिवजन्मोत्सवात उसळणार भगवी लाट! शिवबा मनामनात, घराघरात! बुलडाण्यात सार्वजनिक शिवजयंती अशी साजरी होईल वाचा..

 
patrakar
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रयतेचा राजा असं म्हटलं की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुठलं नाव येत नाही.छत्रपती शिवाजी महाराज जयंती फेब्रुवारी महिन्यात आहे. ही शिवजयंती बुलडाण्यात जल्लोषात साजरी होणार असून, वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले यांनी एका पत्रपरिषदेत दिली.

यावेळी डॉ. सुकेश झवर, सुनील सपकाळ, लक्ष्मीकांत बगाडे, राजेश हेलगे, विधिज्ञ जयसिंग देशमुख, कुणाल गायकवाड, रणजीत राजपूत आदींची उपस्थिती होती. पत्रकार भवनात  घेण्यात आलेल्या पत्र परिषदेत डॉ. शोन चिंचोले म्हणाले की, शिवजयंती उत्सव हा लोकोत्सव म्हणून साजरा होणार आहे. गडकिल्ल्यांचे प्रदर्शन,१७ व १८ फेब्रुवारीला प्रसिद्ध वक्त्यांचे व्याख्यान, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून निघणारी शिवज्योत यात्रा, शिवशाहीर यांचे पोवाडे, मोटरसायकल यात्रा,१९ फेब्रुवारीला शिवकालीन शस्त्रांची प्रदर्शनी, रक्तदान शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहील अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील संथगतीने काम सुरू असलेल्या विकास आराखड्यावर दृष्टिक्षेप टाकण्यात आला. शासनाने व प्रशासकीय यंत्रणेने काम तात्काळ पूर्णत्वाकडे नेण्यासाठी शिवजयंतीला घरोघरी जाऊन स्वाक्षरी मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले. कोरोना काळानंतर यंदा शिवजयंती उत्सवात साजरी होणार असून बुलडाण्यात भगवी लाट उसळणार आहे.