बुलडाण्यातील या शाळेला 'आयएसओ !'जिल्ह्यातील नपाच्या शाळेला पहिला बहुमान

 
Ggu
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  आयएसओ’ मानांकन म्हटले, की एखादा उद्योग-व्यवसाय डोळ्यांसमोर तराळतो! पण  हे मानांकन बुलडाण्यातील एका शाळेने मिळवले आहे आणि हे गुणवत्तेचे मानांकन मिळवणारी शाळा देखील नगर पालिकेची आहे. तुम्ही म्हणाल कोणती शाळा? तर मिर्झा नगर येथील हाजी सय्यद उस्मान डोंगरे उर्दू स्कूल (प्राथमिक शाळा क्रमांक २) असे या शाळेचे नाव आहे. ही शाळा जिल्ह्यातील आयएसओ मिळवणारी पालिकेची पहिली शाळा ठरली आहे.

हाजी सय्यद उस्मान डोंगरे उर्दू शाळेला प्रथमच ‘आयएसओ’ मानांकन मिळाल्याने या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बादलला आहे. पालकांमध्ये सुसंवाद, तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिकवण्याकडे लक्ष दिल्याने नियमित पट संख्या वाढली आहे. शिवाय हातातोंडाची गाठ पडणाऱ्या कष्टकरी समाजानेही या शाळेसाठी पुढाकार घेतला. शिक्षण संस्थेने तसेच नगरपालिकेने मुलांचा केवळ शैक्षणिक विकास हे उद्दिष्ट न ठेवता क्रीडा,सांस्कृतिक क्षेत्रातही मुलांना प्रगत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले. पालिकेने विविध योजना शाळेपर्यंत पोहोचविल्या.

दरम्यान शाळेने सीईओ (महाराष्ट्र राज्य) कार्पोरेट केअर इंडिया यांना प्रस्ताव पाठविला होता. भौतिक सुविधा,शैक्षणिक दर्जा व इतर ४६ मुद्द्यांबाबत तपासणी करण्यात आली होती. तपासणी अंती कार्पोरेट केअर इंडियाने हाजी सय्यद उस्मान डोंगरे उर्दू शाळेला  ‘आयएसओ’ मानांकन बहाल केले. हे मानांकन प्राप्त करणारी बुलडाणा जिल्ह्यातील ही प्रथम शाळा ठरली आहे.