ही अतिशय महत्वाची बातमी आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी! कृषी विभागाचा हा सल्ला वाचाच...

 
jgjh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील सोयाबीनवर पिवळ्या मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादूर्भाव झालेला दिसून येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावरील विषाणूजन्य रोगाचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

 सोयाबीन वरील पिवळ्या मोझॅक रोगाच्या सुरुवातीला पानावर पिवळ्या रंगाचे छोटे छोटे चट्टे दिसतात. त्यानंतर पानावर चमकदार पिवळ्या रंगाचे मोठ्या आकाराचे चट्टे दिसतात आणि पाने पिवळ्या रंगात बदलतात. झाडे खुरटी व खुजी राहतात ही लक्षणे आहेत. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव मुख्यत: रोगग्रस्त बियाण्याद्वारे व  दुय्यम प्रसार हा पांढऱ्या माशी द्वारे होते,

सोयाबीन मोझॅकची विषाणूची लक्षणे ही रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटलेली दिसते पाने आखूड, लहान, जाडसर सुरकुतलेली होतात. पानाच्या कडा खालच्या बाजूने दुमडतात. पानांमध्ये अत्याधिक हिरवेपणा दिसतो. पानाचा काही भाग हिरवा, तर काही भाग पिवळसर दिसून येतो.  रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो. या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास बियाण्याच्या आवरणाचा रंग बदलून करडा तपकिरी काळपट होतो. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यत: रोगग्रस्त बियाण्याद्वारे व दुय्यम प्रसार हा मावा किडी द्वारे होतो.
यावर सुरुवातीलाच रोगग्रस्त झाडे आढळल्यास शेताबाहेर काढून नष्ट करावे, पिकामधील व बांधावरील तन नियंत्रण करून प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे.

   या रोगावर नियंत्रण करताना पांढरी माशी व मावा किडी चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शेतात पिवळे चिकट सापळे १५ बाय ३० सेंमी आकाराचे एकरी २० ते २५ या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या समकक्ष उंचीवर लावावेत. रोग, किडीचा प्रादूर्भाव दिसून येताच प्रादूर्भाव रोखण्यासाठी पांढरी माशी व मावा या किडीच्या व्यवस्थापनाकरीता इमिडाक्लोप्रीड १७.८ एसएल २.५ मिली किंवा फ्लोनीकामाईड ५० टक्के डब्ल्यूजी ३ ग्रॅम किंवा थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यूजी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून या रासायनिक किटकनाशकांची फवारणी करावी. गरज वाटल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. फवारणी करताना किटकनाशके आलटून पालटून वापरावी. शेतकऱ्यांनी पायरेथ्रो ईड किटकनाशकाचा वापर टाळावा, असेही आवाहन जिल्हा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.