जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाचे हे महत्त्वाचे आवाहन...

 
4954
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षांपर्यंत वापरात येते. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासून उत्पादित झालेले सोयाबीन चालू वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरू शकतात. तसेच ग्रामबिजोत्पादन, पीक प्रात्याक्षिक योजनेतंर्गत आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते.

प्रमाणित बियाण्यांपासून आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे त्याची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर करू नये.

बियाणे साठवताना त्याची थप्पी ७ फुटांपेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्‍यावी. बियाणे हाताळताना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी. सोयाबीनची उगवणक्षमता ७० टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. तसेच ७५ ते १०० मि. मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावे.

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी. पेरणीसाठी सोयाबीनचे स्वत:कडील चांगले बियाणे उपयोगात आणावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.