सफाई कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांनी केली सफाई! बुलडाणा शहरातील घटना

 
865
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सफाई कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांनीच हात सफाई करून  मोठा डल्ला मारल्याचे समोर आले आहे. बुलडाणा शहरातील १२ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेची तक्रार काल, १८ एप्रिल रोजी शहर पोलीस देण्यात आली. तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुजा सपकाळ (२८, रा. समता नगर, बुलडाणा) ह्या भारत विद्यालयात साफसफाईचे काम करतात. १२ एप्रिल रोजी सकाळी त्या साफसफाई करण्यासाठी भारत विद्यालयात गेल्या होत्या त्यावेळी घरी कुणीही नव्हते. दुपारी १ वाजता त्या परत आल्या तेव्हा दरवाजाचे कुलूप तुटलेले त्यांना दिसले.  घरातील लोखंडी  कपाट तुटलेले होते.

कपाटातील कपडे जमिनीवर पडलेले असल्याने त्यांना चोरीचा संशय आला. कपाटातील सोन्याचे झूमके, पेंडल, अंगठी, चांदीची चैन व रोख ३१ हजार असा एकूण १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास एएसआय माधव पेटकर करीत आहेत.