"ती"ला दोघांनी नाकारले! मेहकर पोलिसांनी मग दाखवली हुशारी; वाचा मेहकर पोलीस ठाण्यात नक्की घडल तरी काय..

 
856358
मेहकर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  हातात तलवार घेऊन जखमी अवस्थेत एक जण पोलीस ठाण्यात पोहचला. दोघांनी त्याला मारल्याचे त्याने सांगितले. थोड्याच वेळात मारहाण करणाऱ्याचे वडील ठाण्यात पोहचले. त्यांनी त्याची समजूत काढली अन् कशाला तक्रार करता म्हणून प्रकरण तिथेच मिटवले. मात्र तलवार कुणाची असा प्रश्न पोलिसांनी विचारल्यावर दोघांनी एकमेकांची नावे सांगितली.  पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या त्या दोघांविरुद्ध मग पोलिसांनी शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मेहकर पोलीस ठाण्यात काल, १७ एप्रिल रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. उमेश शिवाजी पवार (२२) आणि पवन संतोष हांडे ( दोघे रा. फर्दापूर, ता. चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

त्याचे झाले असे की उमेश पवार आणि पवन हाडे या दोघांमध्ये काल  संध्याकाळी भांडण झाले.  भांडणात जखमी झालेल्या उमेशने रात्री ८ च्या सुमारास हातात तलवार घेऊन मेहकर पोलीस ठाणे गाठले. थेट तलवार घेऊनच उमेश पोलीस ठाण्यात आल्याने पोलिसही काही वेळ चक्रावून गेले. पवन हाडे सोबत भांडण झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तात्काळ उमेशला रुग्णालयात नेऊन तपासणी करून घेतली.

काही वेळानंतर पवन हाडेचे वडील  संतोष हाडे पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पवनची समजूत काढली. त्यामुळे उमेशने कोणतीही तक्रार दिली नाही. मात्र उमेश हातात तलवार घेऊन आल्याने ती तलवार कुणाची आहे? त्याचा परवाना आहे का अशी विचारणा पोलिसांनी  उमेशला केली तेव्हा त्याने पवनचे नाव सांगितले. पोलिसांना पवनला विचारणा केल्यावर त्याने उमेशचे नाव सांगितले. दोघेही एकमेकांची नावे सांगत उडवाउडवीची उत्तरे देत होते. अखेर पोलिसांनी उमेश आणि पवन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तलवार जप्त केली.