देऊळगावमहीच्या तरुणांना हवेय क्रीडांगण! आहे त्यावरही होतेय अतिक्रमण!! लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची तरुणांची मागणी..!!

 
huuk
देऊळगावमही( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  देऊळगावराजा तालुक्यातील मोठे आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचे  असलेल्या देऊळगावमही येथे तरुणांसाठी क्रीडा सुविधांची वानवा आहे. देऊळगावमही - गारखेड रस्त्यावर असलेल्या एका शासकीय जमिनीचा उपयोग तरुण मैदानासाठी करत होते. मात्र आता त्यावरही अतिक्रमण होत असल्याने लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालण्याची मागणी तरुणांकडून होत आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील  मोठी ग्रामपंचायत असलेल्या देऊळगाव मही येथे तरुणांना क्रीडा सुविधा उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. अनेक तरुणांना पोलीस भरती, सैन्यभरतीचा सराव करण्याची इच्छा असूनही मैदानाअभावी तसे करता येत नाही. त्यामुळे देऊळगाव मही येथे सुसज्ज सुविधांचे क्रीडासंकुल उभारण्याची मागणी तरुणांकडून होत आहे.
  
क्रीडासंकुल होणार होते पण....!

 देऊळगावमहीचे टेनिस क्रिकेट मध्ये मोठे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गारखेड रोडवरील "त्या" मैदानात दरवर्षी आयपीलच्या धर्तीवर "डीएमपीएल"  या जिल्ह्यात नावाजलेल्या स्पर्धेचे मोठे आयोजन केल्या जाते. याआधी तत्कालीन मंत्री आणि सिंडखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या मैदानाला भेट दिली होती. इथे भव्य स्वरूपाचे क्रीडासंकुल उभारण्याचा शब्द त्यांनी दिला होता.

त्यासाठीचा पाठपुरावा देखील त्यांनी सुरू केला होता. मात्र या कामाला अपेक्षित गती अजूनही न मिळाल्याने त्याचे पुढे काय झाले असा प्रश्न देऊळगावमहीच्या खेळाडूंना पडलाय. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या मैदानावर अतिक्रमण होत असल्याने आहे त्या मैदानाची सुद्धा दुरावस्था झाल्याने याकडे तात्काळ लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.