कृषिप्रधान बुलडाणा जिल्ह्यात 'लम्पि स्किन' चा धोका वाढला ! ३ जनावरे मृत्युमुखी !! लसीचा तुटवडा; दीड लाख लसींची मागणी

 
gay
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  पाळीव जनावरांसाठी घातक समजल्या जाणाऱ्या 'लम्पि स्किन ' या आजाराचा  जिल्ह्यातील  धोका वाढलाय ! आजअखेर या आजाराने ३ जनावरांचे बळी घेतले असून  बाधित जनावरांची संख्या शतकापल्याड गेली आहे.

शेगाव तालुक्यातुन शिरकाव करणाऱ्या  या आजाराची आज ८ सप्टेंबर अखेर ११९ जनावरांना बाधा झाली आहे. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पशुधन धारक शेतकरी भयभीत झाले आहे.  शेगाव,  देऊळगाव राजा , जळगाव जामोद,  मलकापूर, मोताळा, सिंदखेड राजा या तालुक्यात प्रादुर्भाव जास्त झाल्याची माहिती सहाय्यक आयुक्त( पशुसंवर्धन) डॉ. आर. एस. पाटील यांनी दिली.  

लसीचा तुटवडा

दरम्यान प्रतिबंधक लसीचा तुटवडा असल्याचे  डॉक्टर पाटील  यांनी सांगितले. हा नियमित आजार नसून लसीचे उत्पादन मागणीनुसार करण्यात येते. त्यामुळे तुटवडा असल्याचे सांगून   आजअखेर दीड लाख लसींची मागणी करण्यात आली आहे. पशूंची आंतर जिल्हा, तालुका व राज्य वाहतूक बंद करण्यात आल्याचे डॉ पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच खामगाव, देऊळगाव राजा, दुधा( बुलडाणा) आसलगाव( जळगाव) मलकापूर आदी ठिकाणचे गुरांचे बाजार बंद करण्यात आले आहे.