चोर सोडून संन्याशाला फाशी हे पोलिसांचे धोरण; काही झाले तरी सभा गांधी भवनातच घेणार; संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकरांचा निर्धार..! म्हणाले पोलिसांना आमदार गायकवाडांचा धाक आहे का?

 
khedekar
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आदित्य ठाकरेंच्या सभेच्या परवानगी आम्हाला  गांधी भवन प्रशासनाने दिली होती. मात्र आ. गायकवाड यांचे कार्यालय जवळच असल्याचे कारण पुढे करून आम्हाला सभेचे स्थळ बदलायला सांगितले. पोलिसांचे हे धोरण म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असे आहे. काही झाले तरी आदित्य ठाकरेंची सभा ही गांधी भवनाच्या मैदानातच घेणार असल्याचा निर्धार शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे ७ नोव्हेंबरला बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी मेहकर आणि दुपारी ते बुलडाणा येथे निष्ठा यात्रा सभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान बुलडाणा येथील सभेचे नियोजन जयस्थंभ चौकातील गांधी भवनाच्या प्रांगणात केले होते. मात्र आ. गायकवाड यांचे कार्यालय जवळच  असल्याचे कारण पुढे करून पोलिसांनी आयोजकांना स्थळ बदलण्याच्या सूचना केल्या. यामुळे शिवसेनेच्या गटाकडून पोलीस प्रशासनाबद्दल रोष व्यक्त करण्यात येत आहे.

आमदार गायकवाड यांचा धाक पोलिसांना आहे का? ते सभेत  अडचण निर्माण करतील असे पोलिसांना वाटत असेल तर त्यांच्या कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवा. प्रतिबंधात्मक कारवाई करा. तिथे याआधी अनेक राजकीय सभा झाल्या आहेत. त्यामुळे काही झाले तरी आमची सभा गांधी भवन मैदानातच होईल, ही आर पारची लढाई आहे असे नरेंद्र खेडेकर म्हणाले आहेत. यामुळे आता शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि पोलीस आमने सामने ठाकले आहेत. नवे जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड आता ही परिस्थिती कशी हाताळतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.