चिखलीचा निसार हाजी निघाला चांगलाच करामती; ४०७ वाहनाला मागील बाजूने बांधले भाजीपाल्याचे कॅरेट,आत मध्ये लपवला "माल"! बुलडाणा एलसीबीने उधळला प्लॅन

 
jyg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ४०७ वाहनाला मागच्या बाजूला भाजीपाल्याचे कॅरेट बांधून व आत गुटखा लपवून पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न फसला. चिखलीचा गुटखा व्यापारी निसार हाजी याचा हा कावा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या लक्षात आल्याने त्याचा प्लॅन उधळला गेला. पोलिसांनी गुटख्यासह  ११ लाख ६६ हजार  ३२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वाहन चालक शेख सलीम शेख इस्माईल(५४, रा. आनंदनगर, चिखली) व गुटखा व्यापारी निसार हाजी ( रा. चिखली) दोघांविरुद्ध बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित ४०७ वाहन मलकापूर कडून बुलडाण्याकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बळीराम गीते यांना मिळाली होती. आरटीओ ऑफिस जवळ सदर वाहन अडवून तपासणी केली असता वाहनाच्या मागील बाजूच भाजीपाल्याचे कॅरेट बांधण्यात आले होते, मात्र आत मध्ये १४ प्लॅस्टिकच्या गोण्यामध्ये प्रतिबंधित गुटखा होता. वाहन आणि गुटखा जप्त करून वाहन चालक व व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
   
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बळीराम गीते यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलासकुमार सानप,  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ जुमडे, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, पोना विजय वारुळे,संजय भुजबळ, संभाजी असोलकर, केदार फाळके, पोकॉ सतीश जाधव, पोना शिवानंद मुंडे यांच्या पथकाने पार पाडली.