'अधीर मन झाले'!पहाटधुक्याची बुलडाण्यावर जादू! काय सल्ला दिलाय हवामान तज्ञांनी? वाचा..

 
बुलडाणा (प्रशांत खंडारे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पहाटेने धुक्याची मोहक तेवढीच दाट शाल पांघरलेली...ढगाळ वातावरण.. अंगाला झोंबणारे गार वारे आणि मधूनच अलगद बसणारा पाण्याचा टपोरा थेंब.. अशा रेशमी धुक्याची जादू बुलडाणेकरांनी आज २७ जानेवारीला सकाळी ८ वाजेपर्यंत अनुभवली.निसर्ग सौंदर्य आज खुलून आले होते.अगदी महाबळेश्वरमध्ये असल्याचा भास निसर्गाने करवून दिलाय. या  धुक्याचा नजारा तरुणाईला साद घालत असल्याने अनेकांचे 'अधीर मन झाले' होते.पहाटधुक्याने आच्छादलेलं निसर्गाचं अद्भुत रूप बुलडाणेकरांना पाहायला मिळालंय!

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या बुलडाणा शहराने पहाटे धुक्याची चादर ओढली. त्यामुळे शहर पूर्णतः धुक्यात हरविले होते. अगदी १० फूट अंतरावरची वाट देखील गवसत नव्हती. बुलडाणा-चिखली मार्गावर वाहनांचे हेडलाईट लुकलुकत होते.वाहनचालक वाहने थांबवून निसर्गाचा आनंद लुटताना दिसले. तरुणाई सह लहान-मोठे सेल्फी आणि व्हिडिओ घेण्यात गुंतलेले दिसले. हळूहळू मार्गावरील रहदारी वाढत गेली आणि लोक शांतपणे मार्गस्थ होत गेले. तर घरातील नागरिकांनी आपल्या गॅलरीतून वाफाळलेला चहाचा कप घेऊन हा नजारा आपल्या डोळ्यांनी कैद केला.

द्या हवामान कोरडे,अंशतः ढगाळ

 ऋतूचक्रात सातत्याने बदल होतोय.५ जानेवारीला हवामानातील  गारठा कमालीचा वाढला होता. तो पिकांना बाधक ठरलाय. ८ जानेवारीपर्यंत १० डिग्री सेल्सिअस पेक्षा तापमानात घट झाली होती. काही ठिकाणी पावसाचे तुरळक थेंब टपटपले.तर दिवसा शेकोट्या पेटल्यात. दरम्यान २५ जानेवारीला जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली होती.२६ ते २८ जानेवारी दरम्यान हवामान कोरडे आणि याच दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता बुलडाणा जिल्हा कृषी हवामान केंद्राने वर्तवली होती. आज हा अंदाज खरा ठरला असून, पहाटेच धुके दाटले. हवामान तज्ञ मनेश येदुलवार यांनी शेतकऱ्यांना कृषी सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, अशा ढगाळ वातावरणात शेतकऱ्यांनी कापणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.साठवणुकीची व्यवस्था नसल्यास शेतमाल प्लास्टिक सीटने किंवा ताडपत्रीने झाकून ठेवल्यास शेतमाल सुरक्षित राहील. शेतकऱ्यांनी शेतमालाची काळजी घ्यावी.