उन्हाचा चटका वाढला! सोयाबीन करपण्याच्या वाटेवर! जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे! तीन चार दिवसांत पाऊस आला नाही तर....

 
hjbjn
बुलडाणा( अनंता काशीकर:बुलडाणा  लाइव्ह वृत्तसेवा): सुरुवातीला अपेक्षित असा पाऊस झाल्यानंतर गेल्या आठ दहा दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. यंदा सोयाबीन चांगलेच बहरले होते मात्र शेंगा भरण्याच्या वाटेवर असताना उन्हाचा चटका वाढल्याने सोयाबीन करपण्याच्या मार्गावर आहे.

जिल्ह्यातील एकूण साडेसात लाख हेक्टर क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झालेली  आहे. जिल्ह्यातल्या ९० मंडळात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने बळीराजा आनंदात होता.सोयाबीन ला फुले लागल्यानंतर आता शेंगाची भरणी सुरू आहे. अशातच तापमानात प्रचंड वाढ होऊन पाऊसही गायब झाल्याने शेंगा परिपक्व न झाल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते. सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव सोनारा, देऊळगावराजा तालुक्यातील बहुतांश गावे, चिखली, बुलडाणा, खामगाव, मोताळा, शेगाव या तालुक्यांत सुद्धा सर्वदूर अशीच स्थिती असल्याने जिल्हाभरातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पुढच्या दोन चार दिवसांत पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे.