पत्रकारितेतील बाप माणूस हरपला! शोकाकुल वातावरणात समाधानभाऊ सावळे यांच्यावर अंत्यसंस्कार! भाऊंच्या गोतावळ्याला अश्रू अनावर...

१ मार्च १९६७ ते ३ डिसेंबर २०२२ असा अवघ्या ५६ वर्षांचा समाधान भाऊंचा कार्यकाळ. मात्र डोंगरशेवली सारख्या छोट्याश्या खेड्यातून संघर्षाची लेखणी हातात धरून समाधान भाऊंनी बुलडाण्याच्या पत्रकारिता क्षेत्रात स्वतःची वेगळी स्वतंत्र ओळख निर्माण केली. केवळ पत्रकारिताच नव्हे तर जिजाऊ सैनिकी शाळेच्या माध्यमातून भाऊंनी विदर्भात पहिली मुलींची सैनिकी शाळा सुरू केली. भाऊंची अकाली एक्झीट अनेक चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. भाऊंचे पार्थिव त्यांच्या बुलडाणा येथील निवासस्थानी आणल्यानंतर त्यांनी आयुष्यात जमवलेल्या गोतावळ्याने पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली. मूळ गावी डोंगरशेवली येथे साडेपाच च्या सुमारास त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला. यावेळी राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठितांसह भाऊंवर प्रेम करणाऱ्या अनेकांना अश्रू अनावर झाले होते.