आजी-माजी सैनिकांचे प्रश्न निकाली काढण्याचा 'बुलडाणा तहसील' चा निर्धार! दर महिन्याला मेळाव्याचे नियोजन
निस्वार्थ भावनेने देशाचे रक्षण करणाऱ्या प्रसंगी प्राणाचे बलिदान करणाऱ्या भारतीय जवानांची वा त्यांच्या कुटुंबियाची प्रलंबित शासकीय कामे प्राधान्याने होणे आवश्यक ठरते. मात्र अनेकदा याच्या विपरीत अनुभव येतो. हे टाळण्यासाठी शासनातर्फे अमृत जवान अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बुलडाणा तहसील कार्यालयात 18 जुलै रोजी दुपारी 1 वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली. यावेळी तालुक्यातील आजी माजी सैनिक, विधवा पत्नी, वीर पत्नी व त्यांच्या कुटुंबियांनी हजेरी लावली.
यावेळी प्रामुख्याने शेत रस्ते, ग्राम पंचायत विभाग, रेशनकार्ड ,सात बारा संदर्भातील समस्या मांडण्यात आल्याचे तहसीलदार रूपेश खंडारे यांनी बुलडाणा लाईव्ह सोबत बोलताना सांगितले. आज अर्ज घेऊन समस्या समजून घेण्यात आल्या. त्याचा पुढील मेळाव्यापर्यंत निपटारा करण्याचा निर्धार तहसीलदार खंडारे यांनी यावेळी बोलून दाखविला. आजी माजी सैनिकांना न्याय देण्यासाठी आता दर महिन्याला असे मेळावे घेण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण माहिती देखील त्यांनी दिली.
पावसामुळे हा मेळावा तहसिलदारांच्या कक्षात घेण्यात आला. आयोजनासाठी तहसील कर्मचारी, पुनः नियुक्त माजी सौनिक संघटनेचे गजानन मोतेकर, सांडू भगत, साळवे, गोपाळ रंगनाथ, संजय गिरी, रिंढे आदींनी सहकार्य केले.