गोठ्यांची मरणकळा थांबेना! जिल्ह्यात लंम्पीने ४ हजारावर गुरे दगावली

 
gay
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):लंम्पी चर्मरोगामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 610 जनावरांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. 49,925 जनावरांना लंम्पीची बाधा झाली असून, जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून लाखो रुपये खर्चूनही लंम्पी अवाक्याबाहेरच आहे. शासनाकडूनआता साहित्य खरेदीसाठी नव्याने 1 कोटी रुपयांचा निधी दिला असला तरी, गोठ्यांची मरणकळा थांबता थांबत नाही.

सप्टेंबर पासून बुलडाणा जिल्ह्यात लम्पी थैमान घालत  आहे. तोकड्या मनुष्यबळामुळे पंचनामे करणे अडचणीचे झाले आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभाग लम्पी रोखण्यासाठी प्रयत्नशील असला तरी, जिल्ह्यातील पशुधनाची संख्या पाहता जिल्हा पशुसंवर्धन विभागातील मनुष्यबळ अत्यल्प असल्याने लम्पी अद्यापही पाय पसरतच आहे.

दरम्यान पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुलडाणा जिल्ह्याला मुबलक मनुष्यबळ उपलब्ध करण्याची ग्वाही दिली होती. बुलडाणा जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लम्पीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश सुद्धा दिले होते. लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तत्पूर्वी मंत्रालयीन स्तरावर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी काही विभागात सेवा तत्परतेने देण्यासाठी संस्था व कार्यालयांमध्ये संरचनात्मक सुधारणा करण्याचे व पदांचा आकृतीबंध सुधारित करण्याची आवश्यकता असल्याचे विखे पाटील म्हणाले होते. मात्र याचा काही परिणाम दिसून येत नाही.

5.23 कोटींचा मोबदला

 सध्या राज्य शासनाने 1 कोटी रुपयांचा निधी उपाययोजना म्हणून साहित्य खरेदीसाठी दिला आहे. तसेच आतापर्यंत 4 हजार 610 लंम्पीने जनावरे दगावले. मात्र  2 हजार 81 पशुपालकांना 5.23 कोटींचा मोबदला देण्यात आला आहे.