असामान्यातील ' सामान्याचा' सत्कार सोहळा ठरला असामान्य! पत्रकार अनिल म्हस्के यांचा सन्मान सोहळा ठरला हृदयस्पर्शी! निमित्त राजे लखुजी पुरस्कार सोहळ्याचे
या आनंदी वातावरणाला अन कौटुंबिक स्वरूपाच्या कार्यक्रमाला निमित्त ठरला तो, राजे लखुजी स्मृती पुरस्काराचे यंदाचे मानकरी पत्रकार अनिल म्हस्के यांचा जिल्हा पत्रकार संघातर्फे आज 29 ला दुपारी आयोजित अनौपचारिक सत्कार कार्यक्रम ! वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्य कोषागार पदी नियक्ती झाल्याबद्धल राजेंद्र टिकार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाचे उत्कृष्ठ आयोजन, तात्विक मतभेद विसरून एकवटलेली पत्रकारांची मांदियाळी, वक्त्यांनी 'पत्रकारितेतील राजा माणूस' म्हणून उलगडलेला त्यांचा 2 दशकातील वृत्तपत्रीय प्रवास, शब्दरूपी चौकार आणि षटकारांची सत्कारमूर्तींनी केलेली बरसात, धाराप्रवाही संचलन व श्रवणीय आभार प्रदर्शन, दिलदार माजी अध्यक्ष सुधीर चेके पाटील आणि माध्यमांचे मित्र ही अघोषित पदवी मिळालेले स्वाभिमानी चे नेते रविकांत तुपकर यांची हजेरी (आणि हजर जवाबीपणा) यामुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला आणि जंगी सोहळाच ठरला!
स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांचे वाढदिवस साजरा करण्यासाठी वेळेवर उपस्थित राहतीलच आणि त्यांचा वाढदिवस कोणी लक्षात ठेवील याची खात्री नसणारा जीव म्हणजे पत्रकार होय! मात्र शहरातील पत्रकार बांधवांचा त्यांच्या वाढदिवशी सत्कार करून तो एन्जॉय करण्याचा पायंडा अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी पाडला. आजचा हा कार्यक्रम त्याचा विस्तार ठरावा.
गुण दोषासह स्वीकार हा ' त्यांच्या' मनाचा मोठेपणा '
रविकांत तुपकरांच्या अध्यक्षतेखालील या सोहळ्यात व्यासपीठावर चंद्रकांत बर्दे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे, राजेंद्र टिकार, हे विराजमान होते. या मान्यवरांनी हिंदुस्थान ते पुण्य नगरीचे विभागीय आवृत्ती प्रमुख या म्हस्के या च्या संघर्षमय आणि प्रगतीची विविध पल्ले गाठणाऱ्या प्रवासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. पत्रकारितेला आधुनिक शेतीची, पोल्ट्री फार्मची जोड देण्याचा त्यांच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे यावेळी कौतुक करण्यात आले. रविकांत तुपकरांनी त्यांच्या समवेत असलेल्या निस्वार्थ मैत्रीचे वेगवेगळे पदर उलगडले. आपल्या मनोगतात म्हस्के यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात, चेके पाटील यांचे त्यातील अविस्मरणीय योगदान, आजवरची वाटचाल यावर प्रकाश टाकला.
मला पत्रकार, मित्रांनी स्वीकारले, माया दिली अन प्रेम दिले ही माझी सर्वात मोठी उपलब्धी असल्याचे मी मानतो, असे त्यांनी सांगितले. मला मिळालेला प्रथम पुरस्कार चाहत्यांच्या भरगच्च उपस्थितीने दुसरं लगीनच ठरल्याचे त्यांनी सांगितले तेंव्हा सभागृह खळखळून हास्याने भरून आणि भारून गेले! संचलन 'डीडीकार' युवराज वाघ तर आभार प्रदर्शन 'पत्र नव्हे मित्र'कार गजानन धांडे यांनी मानले.