ट्रायलसाठी दुचाकी नेली, आणलीच नाही! फसवणूकीचा अजब फंडा ! आता भोगावी लागणार कर्माची फळे

सदर प्रकरण असे आहे की,
'दुचाकी विकत घ्यायची आहे,' असे सांगून ती ट्रायलसाठी नेत परत न करता फसवणूक करणाऱ्या एकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट क्रमांक एकच्या न्यायाधीश श्रीमती एच. वाय. कवले यांनी दिला. फिर्यादी शिवाजी नारायण दैवे हे एसटी चालक असून, त्यांनी १७ फेब्रुवारी २०२२ रोजी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी मावसभावास त्यांची जुनी दुचाकी ३० हजार रुपये किंमतीत विक्री करण्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या मावसभावाने याबाबत गजानन भीमराव वऱ्हाडे (रा. नळनी खुर्द, ता. भोकरदन, जि. जालना) यास सांगितले होते.
त्यानंतर वऱ्हाडे याने दैवे यांचे खामगाव येथील घर गाठून ‘तुमची दुचाकी विकत घ्यायची आहे. ती मला चालवून पाहू द्या’, असे सांगून तो दुचाकी घेऊन गेला; मात्र तो परत आलाच नाही. त्यामुळे दैवे यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी गजानन वऱ्हाडे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास पोहेकॉ गजानन जोशी यांनी करीत सदर व्यक्तीस अटक करुन त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. या प्रकरणी ६ जानेवारी रोजी खामगाव न्यायालयात सुनावणी करण्यात आली. सहाय्यक सरकारी अभियोक्ता सविता लोखंडे यांनी अभीयोग पक्षाच्या वतीने एकुण सहा साक्षीदार तपासले. तपास अधिकाऱ्यांची साक्ष व सरकारी अभियोक्ता यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधिश श्रीमती एच. वाय. कवले यांनी गजानन वऱ्हाडे यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.