बुलडाण्याच्या साहित्य संमेलनात "नाराजी'नामा! लांबलचक भाषणाला श्रोते कंटाळले, सूत्रसंचालकाने थांबवल्याने अध्यक्ष संतापले!; मला बोलावलेच कशाला म्‍हणत कागद डायसवर आदळून जागेवर जाऊन बसले!!

 
7565
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पहिल्या महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचा उद्‌घाटन सोहळा आज, २३ एप्रिलला गर्दे वाचनालय परिसरात उभारलेल्या ताराबाई शिंदे साहित्यनगरीत पार पडला. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार असल्याने त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी बुलडाणेकरांची अलोट गर्दी लोटली होती. मात्र नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रम तासभर उशिराने सुरू झाला. भाषणे लांबली. तरीही श्रोत्यांना नागराज मंजुळेंना ऐकायचे असल्याने ते तग धरून होते. मात्र मंजुळेंच्या भाषणाआधी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मुंबई येथील प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन डांगळे भाषणाला उभे राहिले. १५ ते २० मिनिटांत भाषण वाचून दाखवतो, असे ते म्हटले तरी त्यांच्या वाचनाची गती बघता त्यांनी लिहून आणलेले १६ पानी भाषण किमान तासभर लांबण्याची शक्यता होती. नागराज मंजुळे यांचा व्यस्त कार्यक्रम बघता त्यांना लवकर निघणे होते. त्यामुळे सूत्रसंचालकानी अर्जुन डांगळे यांना भाषण थांबविण्याची विनंती केली. याचा डांगळे यांना चांगलाच राग आला. स्टेजवरच ते ओरडले... मला इथे कशालाच बोलावले... असे म्हणत हातातील भाषणाचे कागद डायसवर आदळले अन् जागेवर जाऊन बसले आणि कोणतेही साहित्य संमेलन वादाशिवाय होऊच शकत नाही या दाव्याला पुन्हा एकदा पुष्टी मिळाली!

 

456

पूर्वनियोजित कार्यक्रम पत्रिकेनुसार सकाळी साडेदहाला हे उद्‌घाटन होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात पावणेबाराच्या सुमारास उद्‌घाटन सत्राला सुरुवात झाली. स्वागतगीत, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांचे सत्कार आणि भाषणे याला बराच वेळ लागला. साडेबाराला दुसरे सत्र सुरू होणार होते. मात्र तेव्हा उद्‌घाटन सत्रातील भाषणे नुकतीच सुरू झाली.

स्वागताध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या भाषणाने सभागृहात जोश निर्माण केला. मात्र त्यानंतर लगेच नागराज मंजुळे यांचे भाषण होईल असे श्रोत्यांना वाटत होते. त्यानंतर संमेलनाचे मुख्य निमंत्रक मंत्रालयीन सचिव सिद्धार्थ खरात यांचे भाषण लांबले. श्रोते नागराज मंजुळे यांना ऐकण्यासाठी आलेले असल्याचे भान ठेवत सदानंद देशमुखांनी अवघ्या २ मिनिटांत भाषण उरकले खरे मात्र त्यानंतर नागराज मंजुळेंच्याआधी संमेलनाचे अध्यक्ष अर्जुन डांगळे यांचे भाषण आयोजकांनी ठेवले.

डांगळे यांचे भाषण सुरू असताना त्यांच्या भाषणाच्या छापील प्रती वाटण्यात आल्या. त्यामुळे १६ पानांचे प्रदीर्घ भाषण वाचण्यासाठी त्यांना किमान तास - दीड तास लागला असता. एक पान वाचण्यासाठी त्यांनी १० मिनिटे लावली. त्यामुळे श्रोते कंटाळले. अधून मधून टाळ्या वाजवत होते. नागराज मंजुळे यांना जायचे असल्याने सूत्रसंचालकांनी अध्यक्षांना भाषण थांबविण्याची विनंती केली. मात्र अध्यक्ष डांगळे संतापले. स्टेजवरच त्यांनी त्यांचा रुद्रावतार धारण केला. मला इथे बोलावलेच कशाला, असे म्हणत हातातील भाषणाचे कागद त्यांनी आदळले आणि थेट जागेवर जाऊन बसले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सभागृहातील श्रोते, मंचावरील मान्यवरसुद्धा स्तब्ध झाले. अखेर स्वागताध्यक्ष रविकांत तुपकरांनी समयसूचकता दाखवत माईकचा ताबा घेतला. अर्जुन डांगळे हे खूप मोठे साहित्यिक आहेत. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारणे ही बुलडाणेकरांचे सौभाग्य आहे असे म्हणत घडल्या प्रकाराबद्दल त्यांनी माफी मागितली. अर्जुन डांगळे यांना पुन्हा बोलण्याची विनंती केली. स्टेजवरील सर्वांनीच विनंती केल्याने डांगळे बोलायला उभे राहिले. मात्र अवघ्या तीनच मिनिटांत त्यांनी दुसऱ्यांदा सुरू केलेले भाषण थांबवले.